डिझेल दरवाढीचा मच्छीमारीला मोठा फटका; एकवटले मच्छीमार, उद्या खा.नारायण राणेंची भेट घेणार

देवगड

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट कोकणच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांना बसू लागला आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने डिझेलच्या दरात केलेल्या भरमसाठ वाढीमुळे मच्छीमार पूर्णपणे हवालदिल झाले असून, व्यवसायावरच संक्रांत आली असल्याचे मच्छीमार नेते ज्ञानेश्वर खवळे यांनी म्हटले आहे.

प्रमुख समस्या आणि मागण्या:
* डिझेल दरातील मोठी तफावत: सामान्य पंपावर डिझेलचा दर साधारण ९२ रुपये असताना, मच्छीमारांना ते ११८ रुपये दराने दिले जात होते. मात्र, आता हा दर थेट १४६ रुपये प्रति लिटर केल्याची  माहिती समोर आली आहे.

* हंगाम धोक्यात: मासेमारी हंगामाचे शेवटचे दोन महिने (एप्रिल-मे) उरले आहेत. याच काळात मच्छीमार वर्षभराची बेगमी करत असतो. तसेच हा पर्यटनाचाही काळ असल्याने बाजारपेठ गजबजलेली असते. अशा वेळी वाढीव दरामुळे बोटी बंद ठेवण्याची पाळी आली आहे.

* कामगारांचा प्रश्न: जर व्यवसाय परवडत नसल्याने बोटी बंद केल्या, तर कामगार दोन महिन्यांचा आगाऊ पगार मागत आहेत. पगार दिला नाही तर पुढच्या वर्षी कामगार मिळणार नाहीत, अशा कात्रीत मालक सापडला आहे.

* रिटेल दराची मागणी: पूर्वीप्रमाणेच मच्छीमारांना रिटेल दराने (सर्वसामान्यांप्रमाणे) डिझेल मिळावे, अशी मागणी खवळे यांनी केली आहे. सरकारने मासेमारीला ‘कृषी’ दर्जा दिलेला असतानाही १४६ रुपयांनी डिझेल विकणे हा मच्छीमारांवर अन्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. सुरुवातीला 94 रुपये असलेले हे डिझेल 118 रुपये होते आता ते 146 रुपये होणार ही बातमी कालच आली आहे असेही खवळे यांनी सांगितले

आंदोलनाचा पवित्रा:
मच्छीमारांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उद्या सर्व मच्छीमार प्रतिनिधी विद्यमान खासदार नारायण राणे यांची कणकवली येथे भेट घेणार आहेत.

> “यापूर्वी देखील असा प्रसंग आला होता, तेव्हा नारायण राणे यांनीच हा प्रश्न मार्गी लावला होता. आताही त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. गरज पडल्यास आम्ही दिल्लीला देखील जाऊ. मात्र, जर हा प्रश्न सुटला नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही,” असा इशारा ज्ञानेश्वर खवळे यांनी दिला आहे.
>
या दरवाढीमुळे केवळ मच्छीमारच नव्हे, तर त्यांच्यावर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यावसायिक आणि संपूर्ण बाजारपेठ उध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यावेळी

ज्ञानेश्वर खवळे, उमेश आंबेरकर, शामराव पाटील, सचिन कदम, मनोहर बांदेकर, आकाश हरम, सुनील सावंत, प्रभू सुशांत, प्रशांत कोयंडे, देविदास कुबल, पप्पू भिलारे, बापू जुवाटकर, शशिकांत चोपडेकर, विनोद सारंग, उमेश खवळे. उपस्थित होते