बोअरिंगवरील पाणी भरण्यावरून एकास मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील खेर्डी बौद्धवाडी येथे पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाला जबर मारहाण झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी तिघांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक १ एप्रिल रोजी खेर्डी बौद्धवाडी, ता. चिपळूण येथे घडली. या प्रकरणी रवींद्र भिकाजी मोहिते (वय ५५, रा. खेर्डी बौद्धवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. रवींद्र मोहिते हे आपल्या सामायिक जागेतील बोअरवेलमधून पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचे नातेवाईक दिलीप भिकाजी मोहिते (५८), वैभव दिलीप मोहिते (२६) व दीपाली दिलीप मोहिते (५५ सर्व खेर्डी बौद्धवाडी, ता. चिपळूण) यांनी पाणी भरण्यास मज्जाव केला. या घटनेत दिलीप मोहिते यांनी लोखंडी पाईप रवींद्र मोहिते यांच्या डोक्यावर मारला व शिवीगाळ केली. यावेळी वैभव मोहिते व दीपाली मोहिते यांनीही रवींद्र मोहिते यांचे दोन्ही हात पकडून धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत रवींद्र मोहिते जखमी झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.