मालवण | प्रतिनिधी : निलेश राणे आमदार झाल्यानंतर विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी मच्छीमारांचा प्रश्न उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले होते. मच्छीमारांच्या प्रश्नांची तळमळ असलेले हे हक्काचे नेतृत्व आहे. प्रत्येक अधिवेशनात सातत्याने मच्छीमारांच्या प्रश्नांवर जनतेच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे आवाज उठवित आहेत. सर्वसामान्य जनता व मच्छीमारांनी भरभरून मते देऊन आपला हक्काचा आमदार म्हणून निलेश राणे यांना विधानसभेत पाठविले आहेत.
असे असताना माजी आमदार वैभव नाईक यांनी आपण दहा वर्षे आमदार असताना मच्छीमारांचे किती प्रश्न सोडविले याचे आत्मपरिक्षण करावे, असा सणसणीत टोला मत्स्य व पर्यटन पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला.
तोडणकर यांनी आपल्या बंदरजेटी येथील कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती दिली.
आज आमची तिसरी पिढी आपल्या न्याय हक्कांसाठी लढताना दिसत आहे. वैभव नाईक हे दहा वर्षे आमदार होते आणि त्यांचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, त्यावेळी मच्छीमारांचे एलईडी पर्ससीन आणि परप्रांतीयांचे अतिक्रमण हे दोन प्रश्न आजही कायम आहेत. नाईक यांना हे प्रश्न त्याचवेळी कायमस्वरूपी निकाली का काढता आले नाहीत? असा सवाल श्री. तोडणकर यांनी उपस्थित केला आहे.
जनतेने वैभव नाईक यांचा पराभव करत आमदार निलेश राणे यांना विजयी केले. आमदार नीलेश राणे हे सातत्याने मच्छीमारांच्या प्रश्नांवर अधिवेशनात आणि अधिवेशनाच्या बाहेरही लढत असल्याने मच्छीमारांकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे.
लोकप्रतिनिधींवर हप्तेखोरीची टिका करणाऱ्या नाईक यांना याबाबत कल्पना होती काय? की त्यांच्या कारकिर्दीतही लोकप्रतिनिधींना हप्ते दिले जात होते काय? असाही सवाल तोडणकर यांनी व्यक्त करत पारंपरिक मच्छीमार आणि टॉलर व्यावसायिक पूर्णपणे अडचणीत आलेला आहे. एलईडी पर्ससीनधारकांकडून सातत्याने अतिक्रमण होऊन मच्छीमारांचा घास हिरावून घेतला जात आहे. यामुळे अनेक मच्छीमार कर्जबाजारी होऊन आपला व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहेत. मात्र मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आमदार नीलेश राणे आवाज उठवित आहेत. पालकमंत्री नितेश राणे मच्छिमारांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. नाईक यांनी आपण काय केले? याचे आत्मपरिक्षण केल्यास त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळू शकतील, असाही टोला श्री. तोडणकर यांनी मारला.
सिंधुदुर्गाचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्याकडून बेकादेशीर मासेमारीवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. मत्स्य व्यवसाय विभागाकडून अधिक गतीमान पद्धतीने कारवाई होत आहे. प्रसंगी ड्रोन च्या सहाय्यानेही बेकादेशीर मासेमारी रोखली जात आहे. हे सर्व होत असताना मच्छीमारांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम वैभव नाईक यांनी करू नये असेही श्री. तोडणकर म्हणाले.












