साईप्रसाद काणेकर आक्रमक
बांदा : प्रतिनिधी
राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांचे विस्थापन सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येणार असेल तर प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी प्रशासनाला दिला आहे.
काणेकर म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग व विकासाला आमचा मुळीच विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली स्थानिक शेतकऱ्यांना विस्थापित करून त्यांचा उदरनिर्वाह हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला तर तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि पर्यायी व्यवस्था न देता जबरदस्तीने जमीन संपादन केली जाणार असेल तर ठाकरे शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या गावांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी वर्गात नाराजी वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य तो समन्वय साधून मार्ग काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.











