​अंजली दमानियांचे आरोप अनाठायी : केवळ संपर्कावरून मंत्र्यांना लक्ष्य करणे चुकीचे

आमदार दीपक केसरकर यांची टीका : दीपक लोंढेंशी संबंध नसल्याचे केले स्पष्ट

​सावंतवाडी । प्रतिनिधी : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांवर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि तथ्यहीन आहेत. केवळ फोनवर संवाद झाला म्हणून कोणावरही अशा प्रकारचे आरोप करणे अनाठायी असल्याचे मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. पत्रकारांशी सोशल मिडीयाच्या माध्यमाच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनीही प्रतिक्रिया दिली.

​ श्रीमती अंजली दमानिया यांनी खरात यांच्याशी काही वरिष्ठ मंत्र्यांचा संपर्क झाल्याचा दावा केला होता. यावर भाष्य करताना केसरकर म्हणाले की, “जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नव्हते किंवा ती व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात नव्हती, तोपर्यंत त्यांच्याशी कोणीही संवाद साधला असेल, तर त्यात बेकायदेशीर असे काहीही नाही. केवळ संपर्कावरून मंत्र्यांना या प्रकरणात ओढणे चुकीचे आहे.”
या प्रकरणाशी जोडले जात असलेले दीपक लोंढे हे सिन्नरचे रहिवासी असून ते खरात यांच्या परिचयाचे आहेत. त्या ओळखीमुळे त्यांचा संवाद झाला असावा, मात्र त्या प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. प्रत्येक विषयात विनाकारण माझे नाव ओढण्याचे प्रयत्न राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.