लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; सहा एप्रिलच्या मोर्चाला व्यापक स्वरूप

खेड (प्रतिनिधी – राकेश कोळी) : कोकणातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्ष आता अधिक तीव्र होत असून येत्या ६ एप्रिल रोजी या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचकोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती तसेच पंचक्रोशीतील विविध ग्रामपंचायतींच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांना मोर्चाचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या ६ एप्रिलच्या मोर्चाला आता अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होणार असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनानेही तयारी सुरू केली असून मोर्चा काढण्यात येणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
आंदोलकांच्या वतीने हा मोर्चा अत्यंत नियोजनबद्ध आणि सनदशीर मार्गाने काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक प्रकल्पाविरोधातील स्थानिकांचा रोष वाढत असल्याने या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.