श्वानच्या मदतीने केली कारवाई
वैभववाडी | प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यातील सोनाळी गावात घडलेल्या हत्याकांड्याने जिल्हा हादरला आहे. सोनाळी वाणीवाडी येथील वयोवृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. जयश्री दत्ताराम साटम (थोटम) वय 65 असे त्या मृत महिलेचे नाव आहेे. ही घटना मंगळवारी रात्री 7:30 वा. च्या सुमारास घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. घटनेपासून केवळ दोन तासातच पोलिसांनी गावातील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सचिन सुरेश निखार्गे वय 40 असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. तत्परता दाखवत व श्वान च्या मदतीने पोलिसांनी केलेल्या कारवाईचे तालुक्यात कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मयत जयश्री साटम (थोटम) ही सोनाळी वाणीवाडी येथे एकटीच राहत होती. संशयित आरोपी सचिन निखार्गे हा तिच्या घरी अधून मधून जात होता. मंगळवारी सायंकाळी तो जयश्रीच्या घरी गेला होता. मयत जयश्री व सचिन यांच्यात झटापट होऊन त्यात धारदार शस्त्राने आरोपीने जयश्री ची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सचिनच्या अंगावर नखाचे ओरखडे ही पोलिसांना दिसून आले आहेत. या घटनेत मयत जयश्रीच्या मानेवर व छातीवर खोलवर वार झाले आहेत.
रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास सोनाळी गावचे सरपंच भीमराव भोसले हे कामानिमित्त मयत जयश्रीच्या घरी गेले. भोसले यांनी बाहेरून जयश्री ला आवाज दिला. त्यानंतर भोसले यांनी तीच्या घराचा दरवाजा उघडला. दरम्यान जयश्री रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. याची माहिती भोसले यांनी स्थानिकांना दिली. तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, सपोनि फारणे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील, हवालदार शैलेश कांबळे, अभिजीत तावडे, राहुल तळसकर, श्री. नारणवार, श्री धडे, सौ शिंगाडे, श्री बिलपे, श्री. संदीप कांबळे आदी घटनास्थळी दाखल झाले. सरपंच भीमराव भोसले व स्थानिकांकडून माहिती गोळा करत पोलिसांनी तात्काळ घटनेचा पंचनामा केला. याची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली. रात्री 10:30 वाजता लोकल क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सपोनि श्री. घाग, पोलीस उपनिरीक्षक रामू शेळके, एएसआय कोयंडे, हेड कॉन्स्टेबल राजू जामसांडेकर, आरमारकर, किरण देसाई, आशिष गंगावणे प्रमोद काळसेकर आदी घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक ही घटनास्थळी पोहोचले.पोलीस अधीक्षक राहुल अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे हे देखील घटनास्थळी पोहोचले.मयत जयश्री साटम व आरोपी सचिन निखार्गे यांच्या घरामधील अंतर अर्धा किमी इतके आहे. श्वान ने आरोपीचे घर पाऊस व नाला आदी अडथळे असताना देखील शोधून काढले. पोलिसांनी संशयित आरोपी सचिन याला ताब्यात घेतले आहे.
संशयित आरोपी अट्टल गुन्हेगार
संशयित आरोपी सचिन निखार्गे अट्टल गुन्हेगार आहे. चोरी, घरफोडी व बलात्कार असे त्याच्यावर जवळपास सात ते आठ गुन्हे मुंबईत दाखल आहेत. तब्बल 14 वर्षे जेलवारी करून तो आला आहे. अडीज वर्षांपूर्वी तो सोनाळी येथे वास्तव्यास आला आहे. त्याचे वयोवृद्ध आई-वडील गावीच आहेत. यापूर्वी केलेल्या सर्व गुन्ह्याची माहिती पोलिसांनी मिळवली आहे
पैशाच्या व दागिन्याच्या मोहासाठी घेतले टोकाचे पाऊल
मयत जयश्रीच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. पैशाच्या आणि दागिन्याच्या मोहासाठीच आरोपीने तिचा खून केला असावा असा संशय व्यक्त होत आहे.
सरपंच भिमराव भोसले यांच्यामुळे गुन्हा लवकर उघडकीस
सरपंच भोसले त्यांच्या घरी गेले. त्यांनी जयश्रीला आवाज दिला. परंतु घरातून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे भोसले यांनी दार उघडले. दार उघडतास त्यांना जयश्री रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनाला आले. मयत जयश्रीचे घर एका बाजूला आहे. आजूबाजूला इतर घरे नाहीत सरपंच गेले नसते तर इतक्या लवकर घटना उघडकीस आली नसती. दरम्यान त्या आरोपींनी आणखी शक्कल लढवून त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असती.जयश्री या मूळच्या नावळे गावच्या परंतु गेल्या अनेक वर्षापासून सोनाळीत वास्तव्यास होत्या. आरोपी सचिन निखार्गे याच्यावर 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. बुधवारी सायंकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगाडे करत आहेत.












