शाळेची वाट बदलली तरीही मृत्युने गाठलेच
काळ आणि वेळही आली… प्रत्येक क्षणाची मालकी नियतीची ..
सिंधुदुर्ग ( संतोष वायंगणकर )
जन्म आणि मृत्यु कोणालाही टाळता येत नाही. जगात जन्म आणि मृत्यु शाश्वत आहेत असं मानले जाते. रविवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर सायकलने रस्ता ओलांडू पहाणाऱ्या विराज निलेश तेली (वय ११ वर्षे) या शाळकरी मुलाच्या मृत्युने सारेच हळहळले. बिबवणे येथील लक्ष्मीनारायण विद्यालयात पाचवीत शिकणाऱ्या विराजचे कुटुंब गुढीपूर-कुडाळ येथे रहातात. यामुळे विराजला कुडाळ येथे शाळेत शिकणं अधिक सोप होते. परंतु आपल्या मुलाला कुडाळला शाळेत शिकण्यासाठी पाठवले तर तीन ठिकाणी रस्ता ओलांडावा लागणार. दुर्दैवाने अपघात होईल या भितीने आणि काळजीने विराजचे वडिल निलेश तेली यांनी विराजला बिबवणे येथील लक्ष्मीनारायण विद्यालयात शिक्षणासाठी पाठविले. बिबवणेच्या लक्ष्मीनारायण विद्यालयाची बस येऊन विद्यार्थ्यांना घेऊन जाते व आणून सोडते. यामुळे आपल्या मुलाला रस्ता ओलांडण्याची भिती नाही याच उद्देशाने वडिल निलेश तेली यांनी विराजला बिबवणे येथील शाळेत दाखल केले होते. परंतु विराजवर त्या कारच्या रूपाने काळ आला आणि रविवारी सुट्टी असल्याने सायकल फिरवण्यासाठी घराबाहेर पडलेला विराज पुन्हा परतलाच नाही. त्याची वेळ आणि काळही आला होता. म्हणूनच वडिल निलेश यांनी काळजी घेऊनही विराजला मृत्युने गाठले. निलेश तेली हे बोर्डवे ता.कणकवली येथील असून ते एका शोरूममध्ये नोकरीला आहेत. विराजच्या या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबियांप्रमाणेच परिसरातील सारेच हळहळ व्यक्त करीत आहेत.
Home महत्वाच्या बातम्या शाळेची वाट बदलली तरीही मृत्युने गाठलेच, काळ आणि वेळही आली… प्रत्येक क्षणाची...












