सौर ऊर्जा प्रकल्पाच्या संशोधनाला राज्यस्तरावर दाद; यशश्री ताम्हणकर ठरली ‘बालवैज्ञानिक’!

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत पटकावले सिल्व्हर मेडल!

मसुरे | झुंजार पेडणेकर : बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगावची विद्यार्थीनी यशश्री गुरुनाथ ताम्हणकर हिने रौप्यपदक पटकावले.

यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथील कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, डॉ. मुकुंद अळणकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रोख पारितोषिक, रजत प्रमाणपत्र, चषक देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करुन त्यांच्या संशोधक वृत्तीला दिशा देण्यासाठी लेखी, प्रात्यक्षिक व संशोधन अशा तीन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्रातील विज्ञान विषयातील ही महत्त्वाची स्पर्धा परीक्षा असून राज्यातील विविध विभागांमधील सहभागी विद्यार्थ्यांची १०० गुणांची लेखी परीक्षा, ३० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा व संशोधन प्रकल्प मुलाखत अशी निवड चाचणी घेण्यात येते. या विद्यार्थ्यांमधून प्रत्येक स्तरावर सुमारे १० टक्के गुणवत्ताधारक विद्यार्थी पुढील फेरीसाठी निवडले जातात. यशश्री ताम्हणकर हिने लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेत यश मिळवून संशोधन फेरीसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचा अभ्यास या विषयावर संशोधन अहवाल सादर केला होता.

या संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी माळगाव हायस्कूलचे शिक्षक श्री. सागर मिसाळ, सौ. सिद्धिका जाधव, निकिता माळगावकर, श्री. रणजीत राणे, युरेका सायन्स सेंटरच्या मार्गदर्शिका सौ. सुषमा केणी मॅडम आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. रवळू बेनके, केंद्रप्रमुख श्री. नंदकिशोर गोसावी, माळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्री. संजय खोत, उपाध्यक्ष श्री. अरुण भोगले, सेक्रेटरी श्री. हेमंत हडकर आणि ग्रामस्थ यांनी यशश्रीचे अभिनंदन केले आहे. यशश्री ही मसूरे देऊळवाडा शाळेचे मुख्याध्यापक गुरुनाथ ताम्हणकर व शिक्षिका सौ तेजल ताम्हणकर यांची कन्या आहे.