खेडमध्ये शिवसेना तालुका संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; पदाधिकाऱ्यांना संघटन मजबुतीसाठी मार्गदर्शन

खेड (प्रतिनिधी) : शिवसेना खेड तालुका संघटनेची अत्यंत महत्त्वाची बैठक रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी भरणे येथील जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल येथे उत्साहात पार पडली. हायवे लगत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस तालुक्यातील विविध स्तरांवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या बैठकीला शाखाप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बुथप्रमुख, गटप्रमुख, बीएलए, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेना तसेच अल्पसंख्याक आणि इतर आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण सभागृह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने भरून गेले होते.
बैठकीदरम्यान मान्यवरांनी संघटन बळकटीकरण, आगामी निवडणुकांची तयारी, तसेच तळागाळापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय राहून जनतेशी संवाद वाढवावा, स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी उपनेते मा. श्री. संजयराव कदम, रायगड लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख मा. श्री. अनिल नवगणे, रत्नागिरी जिल्हाप्रमुख मा. श्री. शशिकांत चव्हाण, माजी बांधकाम सभापती व जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. आण्णा कदम, तालुकाप्रमुख व जि.प. सदस्य श्री. सचिन धाडवे, गुहागर तालुकाप्रमुख श्री. अरविंद चव्हाण, पंचायत समिती खेड सभापती मा. आफिया पालेकर, खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मा. सौ. माधवी बुटाला, पंचायत समिती खेड उपसभापती मा. श्री. सुनिल मोरे तसेच खेड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मा. श्री. पप्पूशेठ चिकणे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीतून शिवसेना संघटनेची ताकद अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून आगामी काळात तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.