जिजाऊ संस्थेच्या रांगोळी स्पर्धेला राज्यभरातून लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
देवरूख (प्रतिनिधी):
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (केंद्र– संगमेश्वर, देवरुख) यांच्यावतीने आयोजित “राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा: २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाली. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील केदार सखाराम टेमकर याने आपल्या अप्रतिम कलाकृतीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.
युद्धाच्या झळांनी होरपळणारी यंत्रणा आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर वास्तववादी संदेश देणारी रांगोळी साकारत केदारने उपस्थितांची मने जिंकली. त्याच्या या कलाकृतीस प्रथम क्रमांकचे १० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. संस्थापक मा. श्री. निलेश भाऊसाहेब सांबरे यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेला राज्यभरातील कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध रंगसंगती, कल्पकता आणि सामाजिक संदेशांनी सजलेल्या रांगोळ्यांनी स्पर्धेला विशेष आकर्षण प्राप्त करून दिले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक– केदार सखाराम टेमकर (कुडाळ, सिंधुदुर्ग)
द्वितीय क्रमांक– विलास विजय रहाटे (देवरुख, रत्नागिरी)
तृतीय क्रमांक– मनोज नारायण चव्हाण (कर्जत, मुंबई)
उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते :
उत्तेजनार्थ १– अभिषेक आनंद सुतार (भांडुप, मुंबई)
उत्तेजनार्थ २– अक्षय शिवाजी वहाळकर (देवरुख, रत्नागिरी)
उत्तेजनार्थ ३– गौरव रमेश सुर्वे (रत्नागिरी)
स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी तसेच कला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. स्पर्धकांनी आपल्या सर्जनशील कलाकृतींमधून उत्कृष्ट कौशल्य सादर करत स्पर्धेची शोभा अधिकच वाढवली. विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सुयोग्य नियोजन, उत्तम व्यवस्थापन आणि कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून उपस्थितांकडून या स्पर्धेचे विशेष कौतुक करण्यात आले.












