राजापुरातील सुखकर्ता स्टेशनर्स एन्ड सप्लायर्स दुकानाच्या स्टेशनरी गोदामाला अचानक लागली आग आगीत स्टेशनरी साहित्य जळून साडेचार लाखाचे नुकसान

राजापूर प्रतिनिधी: शहरातील सुखकर्ता स्टेशनर्स एन्ड सप्लायर्स दुकानाच्या स्टेशनरी साहित्य ठेवलेल्या गोदामाला अचानक आग लागून गोदामातील सर्व स्टेशनरी साहित्य जळून खाक झाले आहे. मंगळवारी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी सुखकर्ता स्टेशनर्स एन्ड सप्लायर्सचे मालक विनोद मनोहर पवार रा. राजापूर यांनी राजापूर पोलीसांत तक्रार दिली असून या आगीत पवार यांचे सुमारे साडेचार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र या आगीत पवार यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर शौचेवाडा भागात पवार यांचे सुखकर्ता स्टेशनर्स एन्ड सप्लायर्स नावाने स्टेशनरीचे दुकान आहे. याच ठिकाणी शौचेवाडयामध्येच असलेल्या स्वागत लॉज मध्ये त्यांचे विविध प्रकारचे स्टेशनरी साहित्य ठेवण्याचे गोदाम आहे. या ठिकाणी त्यांचे सर्व स्टेशनरीचे सर्व साहित्य ठेवलेले असते. मंगळवारी दुपारी १२.३५ च्या दरम्यान अचानक या गोदामातुन धुर येऊन मोठी आग पेटल्याचे निदर्शनास आले. यावेळी शौचेवाडा व स्वागत लॉज परिसरात असलेल्या लोकांनी तात्काळ पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत संपुर्ण स्टेशनरी साहित्य जळून खाक झाले होते.
याबाबत विनोद पवार यांनी तात्काळ राजापूर पोलीसांत संपर्क साधून आगीबाबत माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील यांनी आपल्या सहकाऱ्ऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पहाणी केली व पंचनामा केला. यामध्ये पवार यांचे गोदामातील विविध प्रकारचे सुमारे चार लाख ४५ हजार रूपयांचे स्टेशनरी साहित्य जळून खाक झाल्याची नोंद पोलीसांनी पंचनाम्यात केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आकस्मिक जळीत अशी नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अचानक लागलेल्या या आगीत पवार यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र या आगीचे नेमके कारण कळून आलेले नाही. त्यामुळे आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.