६९ जागांसाठी तब्बल २,०९४ अर्जांची नोंद
लॉटरीनंतर लवकरच पात्र व प्रतीक्षा यादी जाहीर
पुण्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेत यंदा मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. बिबवेवाडी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये २५ टक्के राखीव जागांसाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. केवळ ६९ जागांसाठी तब्बल २,०९४ अर्ज दाखल झाल्याने पालकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. राज्यभरातही मोठ्या प्रमाणावर अर्ज नोंदवले गेले आहेत. लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
पुणे : बिबवेवाडी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
आरटीई प्रवेशासाठी लॉटरी प्रक्रिया पार पडल्यानंतर ही माहिती समोर आली. या शाळेत ६९ जागांसाठी एकूण २,०९४ अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यामुळे स्पर्धा तीव्र झाल्याचे दिसून येते.
राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले की, पात्र विद्यार्थ्यांची यादी आणि प्रतीक्षा यादी पुढील दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.
यंदा राज्यभरातील ८,७०१ शाळांमध्ये एकूण १,१४,८२६ जागा उपलब्ध असून २,८९,६०९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण झाली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि विकास परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सोडत काढली.
सिंग यांनी पालकांना इशारा देताना सांगितले की, आरटीई प्रवेशासाठी एजंटांकडून पैसे मागितल्याच्या तक्रारी पूर्वी आल्या आहेत. त्यामुळे पालकांनी अशा लोकांवर विश्वास ठेवू नये, कारण संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने होते. अनियमितता आढळल्यास तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल.











