तळाशील खाडीत वाळू उत्खननाला लगाम!

बंधाऱ्यांच्या कामांना गती – आम. निलेश राणे. 

आंदोलन स्थळी आज सायं . ४ वा. दाखल होणार!

सिंधुनगरी l प्रतिनिधी ‘: तळाशील खाडी, नदीपात्रालगत वाळू उत्खननास कोणतीही परवानगी नाही, तसेच बेकायदेशीर उत्खनन पूर्णतः थांबवण्यात येईल, अशी ठाम ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली. खारभूमी बंदराच्या कामांना तात्काळ सुरुवात केली जाईल, असे आश्वासन देत त्यांनी ग्रामस्थांच्या आंदोलनस्थळी आजच सायंकाळी ४ वाजता भेट देण्याचाही शब्द दिला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तळाशील ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी “सरकार आपले आहे, त्यामुळे प्रशासन आपल्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढेल,” असा विश्वास व्यक्त केला. ग्रामस्थांच्या निवेदनानुसार प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मालवण तालुक्यातील तळाशील गावातील महिला व नागरिकांनी बेकायदेशीर वाळू उत्खनना विरोधात खाडी किनारी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल आमदार निलेश राणे यांनी घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळोसे, अन्य संबंधित अधिकारी व तळाशील गाव समितीचे अध्यक्ष संजय केळुसकर, गावच्या सरपंच स्नेहा तोंडवलकर, अजित केणी, संजय जुवाटकर, नाना टीकम, भूपाल मालनकर, निशिकांत चोडणकर, श्रीमती स्वप्नाली तारी, श्रीमती पूजा शेलटकर या प्रमुख ग्रामस्थांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

वाळू उत्खननामुळे या गावची व या गावात जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे, पिण्याच्या पाणी खारे होत आहे, म्हणून आमचा गाव वाचवा अशी हाक या ग्रामस्थांनी दिली होती. वाळू उत्खनन तातडीने थांबवावे, ज्या वाळू उत्खननाच्या होड्या पकडल्या त्यावर कारवाई व्हावी, या ठिकाणी अधिकृत वाळू टेंडर लावू नये, अशा मागण्या या ग्रामस्थांनी केल्या. याबाबतची प्रशासनानेही गंभीर दखल घेतली होती.

पतन व खारभूमी विभागाकडून ज्या बंधार्‍यांची कामे आहेत त्याबाबत आमदार निलेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. निविदा प्रक्रिया व तांत्रिक अडचणी पूर्ण करून तात्काळ हीच कामे सुरू करा असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आपण स्वतः आंदोलन स्थळी येतो त्यानंतर आपण आंदोलन मागे घ्यावे या सूचनेलाही तळाशील ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. आपण गावात उपोषण स्थळी या आम्ही आमचे उपोषण मागे घेऊ असा शब्दही या ग्रामस्थांनी दिला.