बीड जिल्हयातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन

राजापूर व रत्नागिरी येथे केले होते परिविक्षाधीन कालावधीत काम

राजापूर प्रतिनिधी: मुळचे सांगली जिल्हयातील मिरज तालुक्यातील एरंडोली गावचे रहिवाशी असलेले व सध्या बीड जिल्हयातील केज तालुक्याचे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले राकेश आण्णासाहेब गिड्डे (३१) यांचे गुरूवारी पहाटे लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राकेश गिड्डे यांनी रत्नागिर जिल्हयात राजापूर तहसीलदार कार्यालयात व रत्नागिरी तहसीलदार कार्यालयात परिविक्षाधीन कालावधीत नायब तहसीलदार म्हणून काम केले होते. या कालावधीत त्यांनी जनतेच्या कामांना प्राधान्य दिले होते. त्यांच्या या कार्यकाळत राजापूर व रत्नागिरी येथेही त्यांनी मित्र परिवार जोडला होता. रत्नागिरीतुन त्यांची केज तहसीलदारपदी नियुक्ती होत बदली झाली होती. गुरूवारी सकाळी त्यांच्या या अपघाती मृत्युची बातमी कळताच अनेकांना धक्का बसला. एक हुशार आणि तरूण अधिकाऱ्याचा असा अपघाती मृत्यु झाल्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तविला आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. केज वरून लातूरला येत असताना हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. एका कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. केज तहसीलदार म्हणून त्यांनी अल्पावधीतच अत्यंत चांगली कामगीरी केली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आईवडील असा परिवार आहे.