टाळसुरे येथे समोरासमोर धडक; लाडघर ग्रामपंचायतीचे कर्मचारी जखमी

दापोली (विशेष प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील डॉक्टर मोकल बाग परिसरात गुरुवार, दि. ९ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात लाडघर ग्रामपंचायतीचे शिपाई विलास मुरलीधर मयेकर (वय अंदाजे ५०, रा. लाडघर) हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मयेकर हे ग्रामपंचायतीच्या कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून खेडकडे जात असताना टाळसुरे येथील डॉक्टर मोकल बाग परिसरात समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमी विलास मयेकर यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. तर दुसऱ्या जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचे समजते.