अतिशय कष्टप्राय खडतर मार्गक्रमण करत, जनतेचे प्रश्न आक्रमक पद्धतीने हातात घेत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या छायेत घडलेले निखरलेले कार्यकर्ते, शिवसैनिक ही ओळख घेऊन राजकारणाच्या पायऱ्या चढत्या कमानीने पादाक्रांत करत जनमानसात रुजलेले जननायक म्हणजे मा.नारायणराव राणे. सामान्य आक्रमक शिवसैनिक म्हणून मुंबई गाजवणारे नाव मग मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात चमकले. बाळासाहेबांच्या वरदहस्ताने सिंधुदुर्गात विधानसभा लढवून सातत्याने विजयी होत कोकणचे नेते ते महाराष्ट्राचे नेते अशी यशस्वी मजल आपल्या कार्यकर्तृत्वाने घेणारे नेते म्हणून राणेसाहेबांकडे पाहिले जाते.

आमदार म्हणून आक्रमक तेवढ्याच अभ्यासपूर्ण शैलीत आपल्या मतदार संघाचे संपूर्ण सिंधुदुर्गाचे प्रश्न उठवणारे आणि तेवढ्याच आक्रमकपणे शासनाकडून प्रश्न तडीस नेणारे नेते म्हणून प्रारंभीच त्यांनी आपली छाप उठवली.
आपल्या शैलीचा ठसा उमटवत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करणारे नेते
युतीची सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात महसूल सारखे महत्वाचे खाते कोकणच्या सुपुत्राकडे विश्वासाने सोपवले गेले. त्याच कार्यकाळात अखेरच्या चरणात ८ महिन्यांसाठी नारायणराव राणे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. कोकणच्या नेतृत्वाकडे मुख्यमंत्री होण्याचा दुग्धशर्करा योग आला. मुख्यमंत्री म्हणून काम करताना आपल्या शैलीचा ठसा नारायणराव राणे यांनी अल्पावधीत उमटवला. प्रामुख्याने सिंधुदुर्गच्या विकासाची दारे आपल्या मुख्यमंत्रीपदाचे कार्यकाळात त्यांनी प्रशस्त केली. त्यांनी मंजूर केलेल्या योजना, पायाभूत सुविधा, घेतलेले धोरणात्मक निर्णय याचा लाभ घेत आज कोकणपट्ट्यातील सिंधुदुर्ग जिल्हा हा विकास प्रक्रियेत अग्रस्थानी दिसतो. सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न लक्षणीय वाढले. हे सिंधुदुर्गातील विकासाचे प्रतिबिंब म्हणावे लागेल ही किमया करणारा किमयागार म्हणून आदरणीय राणेसाहेबांचे नाव घेतले जाते.
राजकारणात मजल – दरमजल करत स्वतः व आपल्या दोन्ही पुत्रांना यशस्थानी नेणारे नेते
आमदार, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, परत कॅबिनेट मंत्री, राज्यसभा खासदार, केंद्रीय कॅबिनेट मंत्री परत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार याचबरोबर काँग्रेसमध्ये असताना विद्यमान आमदार निलेशजी राणे हे खासदार म्हणून निवडून गेले. ती किमया घडवणारे नेतृत्व म्हणजे नारायणराव राणे. नंतर आपल्या दोन्ही पुत्रांना आमदार म्हणून निवडून आणण्याचे राजकीय कौशल्य साधतानाच ना.नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रीपदही प्राप्त आहे. सिंधुदुर्गातील मध्यवर्ती बँक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, ग्रामपंचायती या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या नेतृत्वाखाली ठेवण्याचे यश नारायणराव राणे यांना वश झालेले आपण पाहत आहोत.
कार्यकर्त्यांमध्ये मिसळून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे व सामान्य माणसालाही हवाहवासा वाटणारे व्यक्तिमत्त्व
अत्यंत आक्रमक शैली, कार्यकर्त्यांमध्ये मिसळून थेट त्यांच्या प्रश्नांना हातात घेणारा बाप माणूस म्हणून नारायणराव राणे यांना ओळखले जाते. अभ्यासुवृत्तीने प्रश्नाला भिडणारा, प्रशासकाला हाताशी घेऊन योजना कार्यान्वित करणारे नेतृत्व म्हणून नारायणराव राणे यांचे जनमानसातील स्थान अलौकिक म्हणावे लागेल. प्रदीर्घकाळ राजकीय प्रवास करत जनतेशी असलेली आपली नाळ अबाधित राखत प्रसंगी अत्यंत खडतर प्रसंगांचा सामना करत परिश्रमपूर्वक हे यश प्राप्त करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती तेवढ्याच तीव्रतेने आपल्या कोकणच्या विकासाचे स्वप्न साकारणारा जननायक म्हणजे नारायणराव राणे.
वेगवेगळ्या क्षेत्राचे उत्तम ज्ञान व त्याचा योग्य ठिकाणी वापर करणारे नेते
आपल्याला राजकारण करायचे असेल, नेतृत्व करायचे असेल तर आपल्याला विविध विषयांचा अभ्यास करावा लागेल. अर्थकारणाच्या, समाजकारणाच्या, उद्योगजगताच्या खाचा खोचा समजावून घ्याव्या लागतील याची जाण ठेवत आपल्याकडे न्यूनतम आवश्यक माहिती धारण करणारे हे व्यक्तिमत्व.या आपल्या चौकसपणाच्या बळावर विधिमंडळात, लोकसभेत, मंत्रिमंडळात, विविध आयुधांचा चौफेर उपयोग करून प्रभावी काम करताना आपण त्यांना अनुभवले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेले नेते
आज सिंधुदुर्गात विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला. सिंधुदुर्गला भव्य वैद्यकीय महाविद्यालय उभारले गेले त्याच श्रेय निर्वेधपणे नारायणराव राणे यांच्याकडे जाते. सिंधुदुर्गला पर्यटन व्यवसायात प्राधान्याने अग्रेसर करण्याची किमया साधणारा किमयागार म्हणजे नारायणराव राणे. सिंधुदुर्गच्या अर्थकारणाच्या मग मत्स्य, पर्यटन, आंबा, लघुउद्योग या प्रत्येक क्षेत्रात तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रात आपल्या जिल्ह्याला प्रयत्नपूर्वक आघाडीला नेण्याचे काम नारायण राणे सातत्याने करताना दिसतात.
राजकारणात उच्च स्थानी राहून जनमानसाशी आपली नाळ जोडलेला नेता
नारायण राणे यांनी सत्तेच्या राजकारणाच महत्व वेळीच ओळखलं. आपल्या जिल्ह्याला पुढे न्यायचं असेल तर सत्तेच पाठबळ हवे हे चाणाक्षपणे ओळखून राजकीय तडजोड करण्याची राजकीय चतुराई करत असतानाही जनमानसावरील आपली पकड त्यांनी सोडली नाही. राजकीय तत्वज्ञानाच्या बाहेर जाऊनही जनमानसाशी असलेली नाळ, आपलं दायित्व कधीही न विसरलेले नेते म्हणजे नारायणराव राणे. जनसेवेची तळमळ, विकासाचे स्वप्न आणि राष्ट्रवादी विचार यांनी भरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे नारायणराव राणे.
प्रचंड अनुभव, जनसेवेची प्रचंड तळमळ, प्रभावी कार्यकर्तृत्व, कमालीची क्रियाशीलता याचे वरदान लाभलेले हे नेतृत्व कोकणच्या विकासाचे युगपुरुष म्हणून ओळखले जातात. दादांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना कोकणच्या विकासाचा अपेक्षित वेग गाठण्यासाठी आदरणीय नारायणराव राणे यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य प्राप्त होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
– ॲड.दीपक पटवर्धन, रत्नागिरी












