४५ वी ज्युनियर खो-खो स्पर्धा ; मुलींचे २७ वे राष्ट्रीय जेतेपद
गुजरात (क्री. प्र.) : ४५ व्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत अंतिम सामन्यात ओडिशाला २७-१९ अशा आठ गुणांनी नमवत महाराष्ट्राने २७ वे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या मुलींनी सलग १२ व्या विजेतेपदाची कामगिरी नोंदवत राष्ट्रीय खो-खोवरील आपले निर्विवाद वर्चस्व अधोरेखित केले आहे.
वडोदरा येथील विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात ओडिशाने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारले. महाराष्ट्राने आक्रमणाची संधी साधत सुरुवातीपासूनच वेगवान खेळ केला. पहिल्या डावात १२ गुण आणि ३ बोनस गुणांची कमाई करत एकूण १५ गुण नोंदवले. महाराष्ट्राच्या आक्रमणापुढे ओडिशाला पहिल्या डावात केवळ ६ गुणांवर समाधान मानावे लागले. पहिल्याच डावात महाराष्ट्राने निर्माण केलेली ही आघाडी सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरली. पहिल्या डावातील आघाडी मिळाल्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही खेळावरील पकड सैल होऊ दिली नाही. आक्रमणात १० गुणांची कमाई करत विजयाच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकले. ओडिशानेही दुसऱ्या डावात १० गुण मिळवत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पहिल्या डावातील पिछाडी भरून काढणे त्यांना शक्य झाले नाही. या डावात महाराष्ट्राने २, तर ओडिशाने ३ बोनस गुण मिळवले. परिणामी महाराष्ट्राने २७-१९ अशी आठ गुणांची विजयी आघाडी कायम राखत सुवर्णपदकावर कब्जा केला. महाराष्ट्राच्या विजयात आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर खेळाडूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्नेहा लामकाने (२.३० मि. संरक्षण व ६ गुण), धनश्री कंक (२ मि. संरक्षण व ४ गुण), मैथिली पवार (१.३० मि. संरक्षण व ६ गुण), अनुष्का ताम्हाणे (१.२० मि. व २.१० मि. संरक्षण), श्वेता नवले (१.४० मि. संरक्षण), गुड्डी राठोड (१.१० मि. संरक्षण) आणि प्रणिती जगदाळे (४ गुण) यांनी प्रभावी खेळ केला. ओडिशाकडून तृप्तीरेखा बारीक (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), सुभाश्री मल्लिक (१.२५ मि. संरक्षण व ४ गुण), लिसारानी रैना (१.३० मि. व १.२० मि. संरक्षण), चिन्मयी प्रधान (१.०० मि. संरक्षण व २ गुण), रक्तिमा भांडा (२.०५ मि. संरक्षण व २ गुण), कादिला मेनका (१.०५ मि. संरक्षण व २ गुण) आणि सुभालक्ष्मी नाथा (१.०५ मि. संरक्षण) यांनी चांगली कामगिरी केली. मात्र महाराष्ट्राच्या आक्रमणाचा वेग आणि सांघिक समन्वय रोखण्यात त्यांना यश आले नाही.
प्रतिक्रिया १
“महाराष्ट्राच्या मुलींनी ओडिशाविरुद्ध मिळवलेला विजय हा त्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि उत्कृष्ट सांघिक समन्वयाचा परिणाम आहे. आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर खेळाडूंनी आत्मविश्वासाने आपली क्षमता सिद्ध केली. खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे मी मनापासून अभिनंदन करतो. आगामी स्पर्धांमध्येही महाराष्ट्राच्या मुली अशीच विजयी घोडदौड कायम ठेवतील.
– प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, सरचिटणीस, महाराष्ट्र खो-खो संघटना













