२९ एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार
लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमधील २४ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून दिनांक 28 एप्रिल रोजी मतदान तर २९ एप्रिल रोजी निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे
लांजा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमधील रिक्त असलेल्या थेट सरपंच जागेसहित एकूण २३ ग्रामपंचायती सदस्य अशा एकूण २४ जागांसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
लांजा तालुक्यात अशा प्रकारे एकूण १३ ग्रामपंचायतीमधील २४ पदे रिक्त आहेत यामध्ये एका थेट सरपंच पदासह उर्वरित २३ ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त आहेत. पोटनिवडणूक होणाऱ्या तेरा ग्रामपंचायतींमध्ये भडे, कुरचुंब ,वाघ्रट,वेरळ, बेनी बुद्रुक, शिरवली, आगवे, खावडी, कोचरी, कोट, पुनस, कोर्ले, वेरवली खुर्द या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या पोटनिवडणूकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमांतर्गत दिनांक ७ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत असून इच्छुक उमेदवारांनी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आपली नामनिर्देशन पत्रे सादर करायची आहेत. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची (उमेदवारी अर्ज) छाननी दि. १५ एप्रिल रोजी होणार असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख ही १७ एप्रिल आहे. या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. दिनांक १७ एप्रिल रोजी निवडणूक चिन्ह देणे तसेच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दिनांक २८ एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दिनांक २९ एप्रिल रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे.












