खेडमध्ये नमो दहीहंडीचा जल्लोष; पाच गोविंदा पथकांची आठ थरांची सलामी

खेड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘नमो दहीहंडी उत्सव-२०२६’ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला. ‘बोल बजरंगबली की जय’ आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आकर्षक विद्युत रोषणाई, लेझर लाईट, भव्य व्यासपीठ आणि गोविंदा पथकांच्या थरारक प्रात्यक्षिकांमुळे उत्सवाला विशेष रंगत आली.
गेली २० वर्षे खेडमध्ये दहीहंडी उत्सवाची परंपरा जपली जात असून यंदाही या उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खेडसह दापोली, हर्णे आणि चिपळूण परिसरातील विविध गोविंदा पथकांनी उत्सवात सहभाग घेतला. बालगोपाल, युवक, महिला तसेच नागरिकांची मोठी गर्दी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहायला मिळाली. गोविंदांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आले.
दहीहंडी हा केवळ धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा उत्सव नसून सामाजिक एकता, संघभावना आणि तरुणाईच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणारा सोहळा असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. विविध भागांतून आलेल्या गोविंदा पथकांनी एकजुटीने थर रचत आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले.
या उत्सवाला भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अॅड. वैभवजी खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदा पथकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. गोविंदा पथकांनी थरावर थर रचत सादर केलेल्या उत्कंठावर्धक खेळाचे त्यांनी कौतुक केले. गोविंदांच्या मेहनतीमुळे आणि एकजुटीमुळे उत्सवाला अधिकच रंगत आल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या ‘नमो दहीहंडी उत्सवा’त खेड तालुक्यातील तब्बल पाच गोविंदा पथकांनी आठ थरांची सलामी दिली. हिंदूराज गोविंदा पथक, खेड; हिंदूराज गोविंदा पथक, दापोली; खेमनाथ गोविंदा पथक, सुसेरी-खारी, खेड; एकविरा गोविंदा पथक, कुंभारवाडा, खेड आणि आई खोंडेकरिन गोविंदा पथक, खोंडे, खेड या पाच पथकांनी आठ थरांची यशस्वी रचना करून उत्सवात विशेष आकर्षण निर्माण केले.
आठ थरांची सलामी देणाऱ्या या पाचही गोविंदा पथकांना विभागून रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह तसेच मानाची गदा देऊन गौरविण्यात आले. गोविंदा पथकांच्या कौशल्यपूर्ण सादरीकरणाला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने खेड शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. सायंकाळनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नागरिकांची गर्दी वाढत गेली. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा उत्साह आणि नागरिकांचा जल्लोष यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्सवमय झाले होते. पारंपरिक दहीहंडी उत्सवाची परंपरा कायम राखत सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.