चर्चगेट ते डहाणू पर्यंत एकूण ११ व्हॉट्सअॅप ग्रूप्स तयार करण्यात आले असून या ग्रूपचे नेतृत्व महिला उपनिरीक्षक किंवा सहाय्यक महिला उपनिरीक्षक करत आहेत. महिला प्रवाशाने छेडछाड, चोरी किंवा पुरुषांच्या घुसखोरीबाबत फोटो आणि स्थानकाचं नाव ग्रूपवर टाकल्यास, पुढच्या एक-दोन स्थानकांतच आरपीएफचे जवान मदतीसाठी डब्यात हजर होतील.
या उपक्रमात आतापर्यंत १५०० हून अधिक नियमित महिला प्रवासी सहभागी झाल्या असून केवळ तांत्रिक मदतच नव्हे तर आरपीएफनं प्रत्यक्ष कारवाईचा बडगाही उभारला आहे. गेल्या ६ महिन्यांत महिलांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या ६,१९५ पुरुषांवर रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या घुसखोरांकडून तब्बल १३ लाख ८४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्त रजत कुंडगीर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. रेल्वेची ‘१३९’ ही हेल्पलाईन सेवा सुरू असली, तरी व्हॉट्सअॅप ग्रूपमुळे फोटो आणि लोकेशन शेअर करणं फार सोपं झाल्यानं गुन्हेगारांना पकडणं अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे या नवीन उपक्रमामुळे आता लोकलमध्ये प्रवास करताना महिलांना घाबरण्याची गरज नाही.












