मैदान व प्रेक्षक गॅलरी उभारणी कामाचा सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते झाला शुभारंभ
वेंगुर्ले : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते तथा सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदार संघाचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वरेया फाउंडेशन पुरस्कृत भव्य अशी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा मर्यादित निमंत्रित संघांची “सिंधूरत्न भूषण चषक २०२६” ही “खुली कबड्डी स्पर्धा” वेंगुर्ले येथे दिनांक १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी महिला व पुरुष अशा दोन गटात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी लागणारे मैदान व प्रेक्षक गॅलरी उभारणी कामाचा शुभारंभ आज शुक्रवारी जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन च्या मान्यतेने वेंगुर्ला तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने, जय मानसीश्वर कबड्डी संघ, वेंगुर्ले आयोजित ही कबड्डी स्पर्धा वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. महिला गटात विजेत्या संघास रोख २० हजार, उपविजेत्या संघास १० हजार तसेच उपांत्य सामन्यात पराभूत दोन्ही संघास प्रत्येकी ३ हजार रुपये व सर्व विजेत्या संघाना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच पुरुष गटात विजेत्या संघास ३० हजार, उपविजेत्या संघास १५ हजार व उपांत्य सामन्यात पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी ५ हजार व सर्व विजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत इतर वैयक्तिक पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत. वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय मैदान येथे ही स्पर्धा सायंकाळी ४ ते रात्री ११ या वेळेत घेण्यात येईल.
दरम्यान आज पासून मैदान व प्रेक्षक गॅलरी उभारणी कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वरेया फाउंडेशनचे सचिव जय महाजन, तसेच तुषार साळगावकर, वसंत तांडेल, भूषण आंगचेकर, सुरेंद्र चव्हाण, भूषण सारंग, पंकज शिरसाट, हेमंत गावडे, राहुल गावडे, अमित गावडे आदी उपस्थित होते.












