गुहागर प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्याहस्ते क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीचे सामाजिक कार्य, तसेच त्यांचे शैक्षणिक कार्य व या सर्व कार्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान याचा संक्षेपात आढावा घेऊन आपण सर्वांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन सामाजिक ऋणाची परतफेड करण्यासाठी यापुढे काहीतरी सामाजिक कार्य केले पाहिजेत. अथवा लेखन करुन किंवा विविध कालाप्रकारातून समाज प्रबोधन करूया. तरच या महामानवाच्या कार्याला व कर्तुत्वाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले असे होईल असे सांगितले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, डॉ. प्रसाद भागवत, प्रा. लंकेश गजभिये, डॉ. दिनेश पारखे, प्रा. कांचन कदम, प्रा. सुभाष घडशी, ग्रंथपाल श्री धनंजय गुरव, ग्रंथ परिचर श्री. परशुराम चव्हाण व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर व श्रोत्यांचे आभार प्रा. कांचन कदम यांनी मानले.












