डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत रत्नागिरीच्या स्पृहा भावेला सुवर्णपदक; भाजपच्या वतीने गौरव

रत्नागिरी : बृहन मुंबई विज्ञान शिक्षक  संघटनेने आयोजित केलेल्या सुप्रसिध्द डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची इयत्ता 6 वीची विद्यार्थिनी कु. स्पृहा तेजराज भावे रत्नागिरी जिल्ह्यामधून एकमेव सुवर्णपदक विजेती ठरली असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराने याची दखल घेऊन शहर मंडळाच्या वतीने स्पृहाचा सत्कार करण्यात आला.
गेली सुमारे 45 वर्षाहून अधिक काळ बृहन मुंबई विज्ञान शिक्षक  संघटना शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन अभ्यासासाठी जागृती निर्माण होण्यासाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा इयत्ता 6 वी आणि 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करीत असते.  विद्यार्थ्यांच्या बायोडेटाच्या माध्यमातून त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अन्य पैलूंचीही नोंद घेतली जाते. या मानांकित स्पर्धेमध्ये देशभरातून लाखाहून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनी भाग घेत असतात. विभागीय स्तरावर या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना कोल्हापूर विभाग नेमण्यात आला होता. स्पर्धेमध्ये सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्यात आली, या परीक्षेला याविभागातील अनेक विद्यार्थी – विद्यार्थिनी यानी भाग घेतला. त्या परीक्षेमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी – विद्यार्थिनी यांची त्यानंतर कोल्हापूर येथे प्रॅक्टीकल परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील 4 स्पर्धक उत्तीर्ण झाले आणि त्यापैकी रत्नागिरी तालुक्यामधून केवळ फाटक हायस्कूल रत्नागिरीची कु. स्पृहा तेजराज भावे उत्तीर्ण झाली होती.
यानंतर स्पर्धेच्या पुढील टप्प्यावर उत्तीर्ण विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना वरील संघटनेकडून एक विषय दिला जातो आणि त्याबाबत विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी स्वत: अभ्यास करून स्वत: मिळविलेल्या माहितीनुसार त्या प्रकल्पाची माहिती स्वहस्ताक्षरामध्ये लिहून, थोडक्यात तो शोधनिबंध मुंबई येथील स्पर्धा समितीकडे पाठवावा लागतो. यानंतर विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी सादर केलेल्या प्रकल्प अहवालविषयक एक आणि  सर्वसामान्य ज्ञानविषयक दुसरा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्यानंतर विजेत्याला पदक प्रदान करण्यात येते.
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाने आयोजित केलेल्या ‘डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा 2025 – 2026’ या अभिमानास्पद उपक्रमात यावर्षी एक लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ही स्पर्धा –  १.लेखी, २.प्रात्यक्षिक, ३.कृती संशोधन अहवाल आणि ४.मुलाखत अशा चार टप्प्यांमध्ये घेतली जाते.  यंदाच्या स्पर्धेची थीम पृथ्वी प्रणाली आणि मानवी कृती (हस्तक्षेप) असा दिला आहे .या विषयावर माणसाच्या हस्तक्षेपामुळे नैसर्गिक संपत्तीमध्ये कसे परिणाम होतात याबाबतचा प्रकल्प सादर करावयाचा होता.
कु. स्पृहा भावे हिने “शाश्वत शेती आंब्याची दिशा कोकणच्या विकासाची” असे घोषवाक्य घेऊन कोकणातील नगदी पीक आंबा, त्याची सध्याची परिस्थिती, रासायनिक खते, औषधे याचे दुष्परिणाम, पीकाचे कमी होणार उत्पादन आणि त्याबरोबर सेंद्रिय आणि नैसर्गिक पध्दतीनेच आंबा पीकाची देखभाल करणे कसे फायद्याचे होऊ शकेल व त्याबाबतची उपाय योजना याविषयीचा प्रकल्प अहवाल सादर केला होता.
या प्रकल्पासाठी रत्नागिरी येथील डॉ. स्वप्नजा मोहिते मॅडम, नारळसंशोधन केंद्राचे डॉ. मालशे आणि किटक शास्त्राचे डॉ. वानखेडे, कृषि अधिकारी हेगडे, तंत्रज्ञ काळे, प्रा. मंगल पटवर्धन, डॉ. संजय केतकर, तसेच आंबा बागायतदार  अमित मुळ्ये, पराग गोगटे, गांडूळ खताची निर्मिती करणा-या श्रीम. भारती जोशी. कलाशिक्षक पावसकर सर इत्यादी अनेकांचे तसेच फाटक हायस्कूलचे सर्व शिक्षक आणि संस्थाचालकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले होते.
सन 2025 – 2026 च्या स्पर्धेमध्ये या सर्व स्पर्धा प्रक्रियेमधून भाग घेऊन फाटक हायस्कूलच्या कु. स्पृहा तेजराज भावे  या विद्यार्थिनीला रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, सरंक्षण मंत्रालयातील निवृत्त डी. आर. डी. ओ. सह संचालक मा. डॉ. ए. जी. नगरकर यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. कु. स्पृहा तेजराज भावे  रत्नागिरी जिल्ह्यामधील सुवर्णपदकाची एकमेव मानकरी ठरली. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा एक अभिमानस्पद प्रसंग असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्त करीत आहेत.
माहिती संकलन  – दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी.
माहिती स्त्रोत  – Adv. धनंजय भावे,  रत्नागिरी.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार, शुभेच्छा समारंभ प्रसंगी भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, संदीप सुर्वे, निलेश आखाडे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा पदाधिकारी शेखर लेले, राजेंद्र पटवर्धन, राजन फाळके, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, प्रज्ञा टाकळे, शोभा शिरोळे, सारिका शर्मा, डॉ मुक्ता बाष्टे, विजय माळवदे, प्रसाद बाष्टे, संदीप मांडवकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.