सफाई मित्रांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी

कर्मचाऱ्यांसह सणाचा आनंद द्विगुणित

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच अहोरात्र शहराच्या स्वच्छतेसाठी राबणाऱ्या सफाई मित्रांसोबत यंदाची दिवाळी उत्साहात साजरी केली. यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा फराळ वाटप करून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

दिवस-रात्र मेहनत करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात या कर्मचाऱ्यांचा आणि सफाई मित्रांचा मोठा वाटा असतो. सणासुदीच्या काळातही आपले कर्तव्य निष्ठेनं पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांसह नगराध्यक्षांनी दिवाळी साजरी करत कृतज्ञता व्यक्त केली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अविरत सेवा देणारे हे सफाई मित्र अर्थाने शहराचे आरोग्यदूत आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच नागरिक स्वच्छ वातावरणात सण साजरे करू शकतात. तसेच अधिकारी, कर्मचारी वर्गाचेही योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळे सावंतवाडीचा कारभार सुस्थितीत सुरू आहे‌. आज त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करताना समाधान मिळत आहे असे उद्गार नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी काढले. तर नगरपरिषद कर्मचारी देविदास आडारकर व सफाई मित्रांनी नगराध्यक्षांच्या या उपक्रमाबद्दल आभार मानत आनंद व्यक्त केला. यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, दिपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक, सुनीता पेडणेकर, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर आदी उपस्थित होते.