रत्नागिरी : प्रतिनिधी
रस्त्यावरील खडीवरुन दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेली तरुणी गंभिर जखमी झाली. तिच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु असून अपघाताची ही घटना गुरुवार 9 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वा.सुमारास संगमेश्वर-कुरधुंडा येथे घडली.
मानसी विलास घडवले (25,रा.लाडघर दापोली) असे अपघातातील जखमी तरुणीचे नाव आहे. ती अक्षय विजय कानसरे (30,रा.उजगाव,संगमेश्वर) याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एक्यू-6404) वरून गुरुवार 9 एप्रिल रोजी दुपारी संगमेश्वर येथील बाजारपेठेत कपडे खरेदी करुन सायंकाळी 4 वा.सुमारास ते पुन्हा काही ठिकाणी देवदर्शन करण्यासाठी जात असताना संगमेश्वर-कुरधुंडा येथील रस्त्यावरील खडीवरुन त्यांची दुचाकी घसरुन अपघात झाला.
या अपघातात मानसी रस्त्यावर खाली फेकली गेल्याने तिच्या डोक्याला गंभिर दुखापत झाली. त्याच दरम्यान त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कार चालकाने माणूसकीच्या नात्याने त्या दोघांनाही ग्रामीण रुग्णालया संगमेश्वर येथे दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत दोघांचीही चौकशी केली. परंतू मानसीला गंभिर दुखापत झाल्याने तिला अधिक उपचारासांठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना गंभिर स्वरुपाची असल्यामुळे रत्नागिरी शहर पोलिसांनी झिरो नंबरने दाखल करुन घेतला आहे. या अपघातप्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.












