रुग्णांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारवाई
मानसिक आरोग्य कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप
पुण्यातील येरवडा प्रादेशिक मानसिक रुग्णालयात रुग्णांकडून स्वच्छता करून घेतल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. संबंधित सफाई कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच मानसिक आरोग्य सेवा कायद्याचे उल्लंघन झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे : येरवडा येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालयात रुग्णांकडून स्वच्छता करून घेतल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित कंत्राटदाराविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी सफाई कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, मेसर्स लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड ही संस्था 2017 पासून 31 मार्च 2026 पर्यंत स्वच्छतेची जबाबदारी सांभाळत होती. मात्र रुग्णांकडून स्वच्छतेची कामे करून घेतल्याचे व्हिडिओ माध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने रुग्णालयाची प्रतिमा मलिन झाली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंत्राटदाराने आवश्यक मनुष्यबळ, साधने आणि साहित्य उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात कमी कामगारांद्वारे आणि अपुरी साधने वापरून स्वच्छता केली जात होती.
रुग्णांकडून काम करून घेणे आणि त्यांचे व्हिडिओ प्रसारित करणे हे मानसिक आरोग्य सेवा कायदा 2017 चे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांच्या हक्कांवर आणि मानवी प्रतिष्ठेवर आघात झाल्याचेही नमूद करण्यात आले.
डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी सांगितले की, कंत्राटदाराला यापूर्वीही कामाच्या दर्जाबाबत अनेक नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच किमान वेतन आणि इतर लाभ न दिल्याच्या तक्रारीही होत्या.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.










