माजगाव सरपंचपद पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून श्रद्धा सावंत यांचा अर्ज दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सावंतवाडी तालुक्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंच पदांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून राजकीय हालचालींना उधाण आले आहे. माजगाव येथील थेट सरपंच पदासाठी आतापर्यंत ४ जणांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीच्यावतीने श्रद्धा मुकुंद सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला.

​माजगाव येथील तत्कालीन थेट सरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या रिक्त पदासाठी भाजपकडून श्रद्धा सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सभापती अशोक दळवी, संजय कानसे, मधूकर देसाई यांच्यासह महायुतीचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​माजगाव व्यतिरिक्त तालुक्यातील नाणोस येथील सरपंच पदासाठीही १ अर्ज दाखल झाला आहे. तसेच तालुक्यातील नाणोस, किनळे, कारिवडे, कास, शेर्ले, निगुडे, रोणापाल, कवठणी, विलवडे आणि कुडतरकरटेंब या ग्रामपंचायतींमधील रिक्त सदस्य पदांसाठी देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पोटनिवडणुकीच्या या प्रक्रियेबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सविस्तर माहिती दिली असून, अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत विविध गावांमधून इच्छुकांनी आपले अर्ज सादर केले आहेत. आता या पोटनिवडणुकीत कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.