​साहित्यिकांनी सामाजिक समतेसाठी स्पष्ट भूमिका घ्यावी : कवी अजय कांडर

​सावंतवाडीत पहिल्या ‘आंबेडकर चौक साहित्य संमेलना’चा उत्साह

विविध मान्यवरांचा गौरव व ग्रंथप्रकाशन

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
“साहित्यिकांनी केवळ लिहून वेगळे न राहता, सामाजिक समतेसाठी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. लेखकाने इतिहासाकडे एककल्ली न पाहता, सामाजिक समतेचे हत्यार म्हणून पाहिले पाहिजे. सिद्धार्थ तांबे यांचे लेखन याच समतेचा आग्रह धरणारे होते,” असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष कवी अजय कांडर यांनी केले.

​सिंधुदुर्गचे सुपुत्र नाटककार, कवी सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मरणार्थ सावंतवाडीत आयोजित पहिल्या ‘आंबेडकर चौक साहित्य संमेलनाचे’ अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून झाले. यावेळी ज्येष्ठ कवी वीरधवल परब, प्रा. एस. एन. पाटील, अरुण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

​या प्रसंगी वीरधवल परब यांनी सिद्धार्थ तांबे यांच्या साहित्यातील सामाजिक वेदना आणि त्यांच्या चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकला. उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी पालिका प्रशासनाच्या वतीने अशा सांस्कृतिक उपक्रमांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. तसेच मधुकर मातोंडकर व विठ्ठल कदम यांनी साहित्य संस्कृती जोपासण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
​पुरस्कार व ग्रंथप्रकाशन:
यावेळी ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांना ‘नाटककार सिद्धार्थ विष्णू तांबे लेखन पुरस्कार’ तर अनिल जाधव यांना ‘कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच कवी हरिचंद्र भिसे यांच्या ‘रानपुराण’ आणि समीर वेंगुर्लेकर यांच्या ‘वारसदार’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवी अरुण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडले.

​या कार्यक्रमाला संमेलन प्रमुख मधुकर मातोंडकर, विठ्ठल कदम, लेखिका वृंदा कांबळी, अभिनेता नंदू पाटील, रमेश बोंद्रे, गोविंद काजरेकर, दीपक पटेकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, प्रा. अरूण पणदूरकर, रवी जाधव, प्रज्ञा मातोंडकर, महेश परूळेकर, स्नेहा फणसळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मधुकर मातोंडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार विठ्ठल कदम यांनी मानले.