हॉर्नवरून वाद, टॅक्सी चालकाने बसचालकाला 50 मीटर फरफटत नेले; मृत्यू

 

पुण्यात मध्यरात्री भीषण घटना, आरोपी अटकेत
वादातून चिडलेल्या चालकाची थरकाप उडवणारी कृती

पुण्यात रस्ता न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका टॅक्सी चालकाने बसचालकाला धडक देत त्याला सुमारे 50 मीटरपर्यंत बोनेटवर फरफटत नेले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बसचालकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी टॅक्सी चालकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


पुणे : रस्ता न दिल्याने वारंवार हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून उरुळी देवाची येथील हडपसर-सासवड रोडवर रविवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास भीषण घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या टॅक्सी चालकाने बसचालकाला धडक देत त्याला सुमारे 50 मीटरपर्यंत बोनेटवर फरफटत नेले आणि त्यानंतर पळ काढला.

जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या बसचालकाकडे आरोपी काही वेळाने परत आला, मात्र या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सागर सायकर (वय 35) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील कृष्ण गोपाल कोइलवाड (वय 30) याला अटक करण्यात आली आहे.

फुरसुंगी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सायकर हे हडपसरजवळील शेवाळवाडी येथील रहिवासी होते. ते स्वतःच्या लक्झरी बसचे चालक असून मित्रांसह ट्रॅव्हल व्यवसाय चालवत होते.

घटनेच्या वेळी सायकर आणि त्यांचा मित्र विजय शिर्के महिलांच्या गटाला तुळजापूर, अक्कलकोट आदी तीर्थक्षेत्रांच्या सहलीसाठी घेऊन जात होते. दोघेही स्वतंत्र बस चालवत होते, तर एक रिकामी टॅक्सी त्यांच्या मागून येत होती.

टॅक्सी चालक सतत हॉर्न वाजवत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र रस्त्यावर जागा नसल्यामुळे त्याला संधी मिळत नव्हती. यानंतर उरुळी देवाची येथे दोन्ही बस थांबवण्यात आल्या आणि सायकर व शिर्के यांनी टॅक्सी चालकाला जाब विचारला.

यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. रागाच्या भरात टॅक्सी चालकाने अचानक वाहनाचा वेग वाढवून सायकर यांना धडक दिली. धडक बसल्यानंतर सायकर बोनेटवर पडले आणि आरोपीने त्यांना काही अंतर फरफटत नेले.

काही अंतरावर सायकर रस्त्यावर कोसळले. यानंतर आरोपीने वाहन थांबवून काही अंतर मागे घेतले आणि पुन्हा पुढे गेला, मात्र सायकर यांचा गंभीर जखमांमुळे मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे आणि अधिक तपास सुरू आहे.