संगमेश्वर तालुक्यात पारा ४२ अंशावर पारा

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर चिपळूण तालुक्यातील नागरिक सध्या उकाडयांनी हैराण झाले आहेत.दुपारच्या वेळेत तब्बल ४२ अंशावर तापमान गेलेले पाहायला मिळत आहे.
सकाळी ११ वाजल्यानंतर अक्षरशः उन्हात गेल्यावर शरीर भाजून निघत आहे.गेले काही दिवस अचानक वाढलेले तापमान यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.या भागात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या शेतातील पेरणी पूर्व भाजावळी यामुळे वातावरणातील काही अंशी तापमान वाढायला मदत होत आहे.
दोन्ही तालुक्यात शाळा सकाळच्या सत्रात भरत असल्या तरी शाळा सुटायला १२ वाजत असल्याने,शाळकरी मुलांना घरी पोहचेपर्यंत नको जीव होत आहे.राज्यामध्ये दोन पॅट परीक्षा १५ व २२ एप्रिल ला बाकी असल्याने मुलांना दररोज शाळेत जावे लागत आहे.ह्या परीक्षा १० एप्रिल पूर्वी पूर्ण कराव्यात अशी मागणी राज्यातील शिक्षक आमदारांकडून होत होती.परंतु याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने,विद्यार्थ्यांना उन्हातून दररोज हेलपाटा मारावा लागत आहे.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना तास,दीड तास पायपीट करून शाळेत जावे लागते.अशा विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यावर उन्हातून पायपीट करत घरी जावे लागत आहे.
चिपळूण शहरात देखील दिवसा देखील एसी चा आधार घ्यावा लागत आहे.ग्रामीण भागात देखील तापमान वाढी मुळे शेतातील सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत कामे मंदावलेली पाहायला मिळत आहेत. वाढलेल्या तापमानाचा त्रास पाळीव जनावराना देखील होत असलेला पाहायला मिळत आहे.
पहाटे वातावरणात येणारा गारवा आणि दुपारी प्रखर व उकाडा यामुळे सर्दी खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
एप्रिल महिन्यातच तापमानाने चाळीशी पार केल्याने,मे महिन्यात तापमानात किती वाढ होणार हे पाहावे लागणार आहे.