चिपळूण बसस्थानकातील चोरीचा गुन्हा उघड; एका महिलेला अटक: चोरीचे दागिने देखील हस्तगत

चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूण येथील मुख्य बसस्थानकावर चिपळूण-तिवरे बसमध्ये चढत असणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे ११ तोळे सोन्याचे १४ लाख ६१ हजार ८५० रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी जलद गतीने तपास करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका महिलेला अटक केली आहे.

मंगला उर्फ शोभा अंकुश साठे ( वय ६०, रा. भाटघर, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, काविळतळी येथील रहिवासी वैष्णवी विश्वनाथ शिंदे (४७) या शनिवारी दुपारी ३:२० वाजण्याच्या सुमारास तिवरे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. बसमध्ये चढत असताना त्यांच्या खांद्याला असलेल्या चॉकलेटी रंगाच्या पर्समध्ये त्यांनी सोन्याचे दागिने असलेली एक हिरव्या रंगाची छोटी पर्स ठेवली होती. गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने अत्यंत चालाकीने ती छोटी पर्स चोरली. वैष्णवी शिंदे यांनी पर्स तपासली असता त्यातील दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीला गेलेल्या एकूण ११ तोळे दागिने सुमारे १४ लाख ६१ हजार ८५० रुपयांचा समावेश होता. वैष्णवी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेतली असता एका महिलेने ही चोरी केली असल्याचे समोर आले. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या संशयित चोरट्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. यामध्ये सौ मंगल उर्फ शोभा अंकुश साठे ( वय ६०, रा. भाटघर, ता. खंडाळा, जि. सातारा ) ही आपल्या घरी आढळून आली. यानंतर तपासाच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तिच्या घराची झडती घेतली असता तिच्या घरामध्ये तिने चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक येथून वैष्णवी शिंदे यांच्या पर्समधून चोरी केलेले दागिने आढळून आल्याने ते दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तर या महिलेला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासिक अधिकारी श्री. माणके, श्री. जोगी यांनी केले आहे. चार दिवसात या चोरीचा उलगडा केल्याने पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.