खेडमध्ये संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्साहात साजरी, विविध धार्मिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

खेड (प्रतिनिधी) : श्री संत गोरा कुंभार मित्र मंडळ, खेड यांच्या वतीने संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्री संत गोरोबाकाका यांच्या पालखी मिरवणुकीने झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यानंतर प्रतिमेची स्थापना करून पूजन करण्यात आले व श्री सत्यनारायणाची महापूजा विधिवत पार पडली.
सायंकाळी तीर्थ-प्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी त्याचा लाभ घेतला.
संपूर्ण कार्यक्रम भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या यशस्वी आयोजनासाठी श्री संत गोरा कुंभार मित्र मंडळ, महिला मंडळ व युवा मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.