दोघे गंभीर जखमी
खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट घाटातील संरक्षण भिंतीवर जाऊन आदळला. अपघात इतका तीव्र होता की, धडक दिल्यानंतर ट्रकचा पुढील भागाचा चक्काचूर झाला तर ट्रक अर्धवट लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

या अपघातात ट्रकमधून प्रवास करणारे दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालकासह अन्य एक जण ट्रकमध्येच अडकून पडले होते. महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी, प्रवाशांनी व मदत ग्रूपचे प्रसाद गांधी यांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढून मदतकार्य सुरू केले.
या घटनेची माहिती मिळताच मदत ग्रुप तसेच जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थेची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, अपघातग्रस्त कंटेनर ट्रकमध्ये थम्सअप कंपनीचे शीतपेय असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे.












