ग्रामपंचायत पोट निवडणूक- २३ ग्रा. पं. सदस्य जागांसाठी २० उमेदवारी अर्ज ,

सरपंच पदाच्या एका जागेसाठी चार अर्ज, छाननीमध्ये सर्वच्या सर्व २४ अर्ज वैध

लांजा (प्रतिनिधी): २८ एप्रिल रोजी होणाऱ्या तालुक्यातील १३ ग्रामपंचायती मधील २३ ग्रामपंचायत सदस्य आणि १ सरपंच पद अशा एकूण २४ जागांसाठी एकूण २३ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून छाननीमध्ये हे सर्वच्यासर्व अर्ज वैध ठरले आहेत.
दरम्यान, १३ ग्रामपंचायतींपैकी ०८ ग्रामपंचायतींच्या ९ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे या जागा पुन्हा एकदा रिक्त राहणार आहेत.
तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतिच्या २३ ग्रा.पं सदस्य आणि एका सरपंच पदाच्या जागेसाठी दिनांक २८ एप्रिल रोजी निवडणूक होणार असून २९ एप्रिल रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १३ एप्रिल रोजी भडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे याच ग्रामपंचायतीच्या चार सदस्य पदासाठी एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्या पाठोपाठ शिरवली ग्रामपंचायतच्या पाच जागांसाठी ०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कोरले ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर आगवे आणि वेरळ या ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी एका जागेसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ते सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहेत.
दरम्यान , कुरचुंब, वाघ्रट, खावडी, कोट, बेनी बुद्रुक, कोचरी, वेरवली खुर्द या आठ ग्रामपंचायतीमधील ९ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत. त्यामुळे या सर्व जागा पुन्हा एकदा रिक्त राहणार आहेत.