मुंबई : महावितरणच्या प्रादेशिक संचालक / कार्यकारी संचालकपदी प्रतिनियुक्तीच्या भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर श्री. अंकुर कावळे, श्री. संदीप पाटील, श्री. चंद्रमणी मिश्रा व श्री. सुनील काकडे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. नवनियुक्त कार्यकारी संचालक याआधी महावितरणमध्ये मुख्य अभियंता म्हणून विविध ठिकाणी कार्यरत होते.
कार्यकारी संचालक श्री. अंकुर कावळे याआधी मुख्यालयात मुख्य अभियंता (वितरण) म्हणून कार्यरत होते. त्यांनी विद्युत अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदविका संपादन केली आहे. सन १९९७ मध्ये सहायक अभियंता म्हणून श्री. कावळे तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये रूजू झाले. पदोन्नतींनंतर त्यांनी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर येथे विविध पदांवर काम केले आहे. सन २०२५ पासून ते मुख्य अभियंता म्हणून मुंबई मुख्यालयात कार्यरत होते.
कार्यकारी संचालक श्री. संदीप पाटील यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी संपादन केली असून सन २००३ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात ते सहायक अभियंता म्हणून रूजू झाले. सन २००९ मध्ये त्यांची थेट भरतीमध्ये कार्यकारी अभियंतापदी निवड झाली. सन २०१८ मध्ये अधीक्षक अभियंतापदी तर सन २०२५ मध्ये त्यांची मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती झाली. श्री. संदीप पाटील हे मुख्य अभियंता (वीज खरेदी) म्हणून मुख्यालयात कार्यरत होते.
कार्यकारी संचालक श्री. चंद्रमणी मिश्रा यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली आहे. सन २००३ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात ते सहायक अभियंता म्हणून रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतींवर त्यांनी अलिबाग, वाशी, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथे काम केले आहे. सन २००९ मध्ये त्यांची थेट भरतीमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. तर सन २०१८ मध्ये अधीक्षक अभियंता म्हणून तर सन २०२४ मुख्य अभियंतापदी पदोन्नतीने झाली. श्री. मिश्रा कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
कार्यकारी संचालक श्री. सुनील काकडे यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली असून १९९७ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये ते सहायक अभियंता म्हणून रूजू झाले. त्यानंतर विविध पदांवर त्यांनी चाळीसगाव, नाशिक, भुसावळ, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, अहिल्यानगर, भांडूप येथे काम केले. श्री. काकडे यांची सन २०२२ मध्ये मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाली. भांडूप परिमंडलानंतर सन २०२५ पासून श्री. सुनील काकडे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.












