त्या परप्रांतीय कामगार मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण :  मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

वैभववाडी तालुक्यात खळबळ 
वैभववाडी प्रतिनिधी : 
       एका परप्रांतीय कामगाराचा मृतदेह काही दिवसापूर्वी सोनाळीत सापडला होता. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. वैभववाडी पोलीस ठाणेत आकस्मित मृत्यू म्हणून त्याची नोंद करण्यात आली होती.  मात्र गेल्या दोन-तीन दिवसापासून सोशल मीडियावर सदर मयत तरुणाला एका तरुणांकडून मारहाण होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हा घातपात की अपघात अशी उलटसुलट चर्चा चालू आहे. पोलिसांकडून चौकशी सुरु झाली आहे.

    मयत राकेश केतन मांझी (वय २५, रा. गोपाळगंज, बिहार) या सेंटरिंग काम करणाऱ्या कामगाराचा सोनाळी गावातील शुक नदीपात्रात मृतदेह आढळून आला होता. ही घटना २७ मार्च रोजी उघडकीस आली होती. राकेश केतन मांझी हा त्याचा मृतदेह सापडण्याआधी दोन दिवसांपासून बेपत्ता होता. वैभववाडी पोलिसांनी पाण्यात बुडून मृत्यू झाला असे प्रथमदर्शनी दिसत असल्यामुळे आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता.

नापणे येथे सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामासाठी बिहारमधून आलेल्या कामगारांमध्ये राकेश मांझी याचा समावेश होता. तो मागील तीन महिन्यांपासून येथे काम करत होता. बुधवारी दिनांक २५ मार्च रोजी वैभववाडी शहरातील आठवडा बाजारासाठी तो गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो नापणे येथील वास्तव्यास परतला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सहकारी कामगारांनी त्याचा शोध सुरू केला, परंतु तो सापडला नाही.

दरम्यान, शुक्रवार दिनांक २७ रोजी सकाळी सोनाळी नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती येथील पोलीस पाटील राजेंद्र रावराणे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सहकारी कामगारांनी मृतदेहाची ओळख राकेश मांझी अशी पटवली. ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. मात्र दोन दिवसापासून मृत राकेश मांझीला जबर मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्याचा या माराहानीत मृत्यू झाला की नदीत बुडून मृत्यू झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. त्यामुळे हा अपघात की घातपात याचा तपास करण्याचे आव्हान वैभववाडी पोलिसासमोर आहे. त्यादृष्टीने  वैभववाडी पोलीस तपास करीत आहेत. काही स्थानिकांकडे चौकशी सुरु आहे.