वैभववाडी शहरातील घटना
वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी शहरात आठवडा बाजारादिवशी अज्ञात चोरट्याने महिलेची पर्स लांबवून 28 हजार रुपये लंपास केले आहेत. ही घटना बुधवारी 11 च्या सुमारास घडली आहे.
कुसुर पिंपळवाडी येथील भक्ती जयवंत पळसुले वय 45 ही वैभववाडी शहरात पिग्मी एजंट म्हणून काम करते. बुधवारी त्यांनी 28 हजार रुपयांची पिग्मी जमा केली होती. सकाळी अकराच्या दरम्यान एसटी स्टँड नजीक असलेल्या स्टॉलवर काही वस्तू घेण्यासाठी हातातील पिशवी खाली ठेवून वस्तू घेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीत असलेली पर्स लांबवून पिशवीतील 28 हजार रुपये लांबविले आहेत.
सदरचे पैसे बँकेत भरण्यासाठी त्यांनी पिशवीमध्ये पर्स शोधली असता ती गायब झाल्याची लक्षात आली.
श्रीमती पळसुले यांनी लगेचच वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत या घटनेची माहिती दिली. वैभववाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील, कॉन्स्टेबल हरेश जायभाय, कॉन्स्टेबल तळसकर यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेऊन शोधा शोध सुरू केली आहे.
दरम्यान वैभववाडी शहराचा बुधवार हा बाजाराचा दिवस असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तर वैभववाडी शहरात नगरपंचायत व पोलीस स्टेशनचे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने पोलिसांना या घटनेचा शोध लावणे अवघड झाले आहे.
शहरात वेळोवेळी होणाऱ्या या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.











