मळगाव येथील स्वयंभू औदुंबर दत्तमंदिराचा २३ रोजी वर्धापन दिन सोहळा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव येथील स्वयंभू औदुंबर दत्तमंदिराचा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी २३ एप्रिल रोजी उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून खानोलकर कुटुंबिय आणि श्री दत्तप्रसाद भजन मंडळ, रस्तावाडा यांच्या वतीने भाविकांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी सकाळी ८ वाजता श्रींच्या चरणांवर अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत श्रीदत्त भक्तांसाठी अभिषेक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुपारी १२ वाजता श्रींची आरती होऊन दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळच्या सत्रात स्थानिक कलाकारांचा ‘भक्तीरंग’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार असून, त्यानंतर स्थानिक भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. मळगाव परिसरातील सर्व भाविकांनी या मंगलमयी सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.