इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; मावळमध्ये दोन दिवसांत दुसरी घटना

 

मित्रांसोबत फिरायला गेलेल्या युवकाचा दुर्दैवी अंत
पवना नदीतही तरुणाचा बळी; प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन

पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. कुंड मळा येथे इंद्रायणी नदीत पोहताना एका 24 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम राबवूनही त्याला वाचवता आले नाही. याआधी पवना नदीतही एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


पुणे : तळेगाव दाभाडेजवळील कुंड मळा येथे इंद्रायणी नदीत शुक्रवारी दुपारी प्रथमेश लोणारे (वय 24) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तो फुगेवाडी येथील रहिवासी असून मित्रांसोबत फिरण्यासाठी येथे आला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, लोणारे पोहण्यासाठी नदीत उतरला होता. मात्र काही वेळातच तो धडपडू लागला आणि पाण्याखाली गेला. घटनेची माहिती मिळताच नीलेश गराडे यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली.

बचाव पथकाने अवघ्या 10 मिनिटांत तरुणाला शोधून काढले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मावळ परिसरात दोन दिवसांत बुडण्याची ही दुसरी घटना आहे. गुरुवारी साळुंब्रे गावाजवळील पवना नदीत रामेश्वर भांड (वय 22, पिंपरी) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद शिरगाव पोलिसांत करण्यात आली आहे.