गुंतवणुकीच्या आमिषाने नागरिकांना जाळ्यात ओढले
जानेवारी ते मार्चदरम्यान विविध भागांत गुन्हे दाखल
पुण्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून अवघ्या तीन महिन्यांत चौघांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात एकूण 1.32 कोटी रुपयांची लूट झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून आरोपींनी नागरिकांना जाळ्यात ओढले. पोलिसांनी विविध ठिकाणी गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.
पुणे : जानेवारी ते मार्च या कालावधीत आकर्षक परताव्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी चौघांकडून तब्बल 1.32 कोटी रुपये लंपास केले आहेत. विश्रामबाग, बाणेर, काळेपडळ आणि तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यांत या संदर्भात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदाशिव पेठेतील 69 वर्षीय निवृत्त व्यक्तीला सोशल मीडियाद्वारे संपर्क साधत शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी त्यांना एक अॅप डाउनलोड करण्यास सांगून बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान त्यांनी 33.45 लाख रुपये पाठवले. पैसे परत मागितल्यावर आरोपींनी विविध कारणे देत आणखी रक्कम मागितल्याचे पोलिसांनी सांगितले.
बालेवाडी येथील 60 वर्षीय व्यक्ती यालाही अशाच प्रकारे फसवण्यात आले. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून जानेवारी ते मार्च दरम्यान 46.43 लाख रुपये उकळण्यात आले. फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी बाणेर पोलिसांत तक्रार दाखल केली.
खाजगी फायनान्स कंपनीतील 36 वर्षीय महिला मॅनेजर हिलाही मोबाईल मेसेजिंग अॅपवरील गुंतवणूक गटात सामील करून फसवण्यात आले. आरोपींनी लिंक पाठवून अॅप डाउनलोड करण्यास सांगितले आणि वेगवेगळ्या खात्यांमध्ये 27 लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमाटणे येथील एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यालाही बनावट बँक अधिकाऱ्यांच्या नावाखाली फसवण्यात आले. मोबाईल अॅपवर गुंतवणूक गटात सामील करून 25.3 लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.










