गुरुद्वाराबाहेर मध्यरात्री हल्ला; नियोजित हत्येची शक्यता
हल्लेखोर फरार; पोलिसांचा तपास सुरू
इटलीतील बर्गामो प्रांतात वैशाखी सणादरम्यान झालेल्या गोळीबारात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गुरुद्वाराबाहेर घडलेल्या या घटनेमुळे भारतीय समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक तपासात ही घटना नियोजित हल्ला असू शकते, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे जप्त करून तपास सुरू केला आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
इटली : बर्गामो प्रांतातील कोवो येथे वैशाखी सणाच्या मेळाव्यादरम्यान दोन भारतीय पुरुषांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुद्वारा माता साहिब कौर जीच्या बाहेरील परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
मृतांची ओळख कोवो येथील ४८ वर्षीय रगिंदर सिंग आणि अग्नाडेलो येथील ४८ वर्षीय गुरुमित सिंग अशी झाली आहे. हे दोघे प्रार्थनास्थळ म्हणून वापरल्या जाणाऱ्या गोदामातून बाहेर पडत असताना हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर घटनास्थळी येऊन थेट गोळीबार करून कारमधून फरार झाला. अधिकाऱ्यांच्या मते, ही घटना अचानक झालेल्या वादातून नसून नियोजित हल्ला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे दहा गोळ्यांचे कवच जप्त केले आहेत. एका साक्षीदाराने सांगितले की, गोळीबार करणारा व्यक्ती भारतीय असून तो गुरुद्वारात वारंवार येत होता. तसेच तिसऱ्या व्यक्तीलाही गोळी लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, मात्र याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून स्थानिक पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे वैशाखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.











