४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार
रत्नागिरी :
आगामी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली होती. या प्रभाग रचनांवर संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात आलेल्या हरकतींवर मंगळवारी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्यासमोर सुनावणी झाली.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना कार्यक्रम फेब्रुवारी पासून हाती घेण्यात आला होता. प्रारुप प्रभाग रचना तयार झाल्यानंतर त्यावर हरकती मागण्यात आल्या होत्या. यात संगमेश्वर तालुक्यातील आंगवली, अंतत्रवली, ओझरे खुर्द, कसबा या गावांमधून सात हरकती आल्या होत्या. तर रत्नागिरीतालुक्यामधून गणपतीपुळे, काळबादेवी, कुरतडे, राई, सोमेश्वर, डोर्ले, नांदिवडे, गावखडी, चिंद्रवली, चांदेराई, कासारी व गडनरळ गावांमधून 20 हरकती प्राप्त झाल्या होत्या. गणपतीपुळेमधून सर्वाधिक नऊ हरकती आल्या होत्या. प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे मंगळवारी या हरकतींवर सुनावणी झाली.
या हरकती व सूचनांवर अभिप्राय नोंदवून त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकाऱ्यांचे अहवाल आल्यावर त्याचा प्रस्ताव तयार करुन तो राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर 4 मे रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिली जाणार आहे.











