वाहन तपासणीत 543 कोटींची रोकड हस्तगत
मतदारसंख्या 5.73 कोटी; तयारी अंतिम टप्प्यात
तामिळनाडूत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. राज्यभरात रोख रक्कम, सोने, दारू आणि औषधांसह तब्बल 1,262 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहन तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड सापडली असून अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सोशल मीडियावरही कडक नजर ठेवून हजारो लिंक हटवण्यात आल्या आहेत. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे.
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनाईक यांनी माहिती देताना सांगितले की, निवडणूक आयोगाने राज्यभरात मोठ्या प्रमाणात कारवाई करत रोख, सोने, दारू आणि औषधांसह 1,262 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाळत ठेवणाऱ्या पथकांनी वाहनांच्या तपासणीदरम्यान तब्बल 543 कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे.
राज्याच्या निवडणूक तयारीबाबत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, विविध उल्लंघनांप्रकरणी 163 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने 2,180 URL हटवले असून विविध प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवले जात आहे.
मतदार याद्यांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, राज्यात एकूण 5.73 कोटी मतदार आहेत. यामध्ये 2.93 कोटी महिला, 2.83 कोटी पुरुष आणि 7,728 तृतीय लिंग मतदारांचा समावेश आहे.
यंदा पहिल्यांदा मतदान करणाऱ्या 14,59,039 मतदारांची वाढ झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी 33,133 ठिकाणी 75,064 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासाठी 1,06,418 बॅलेट युनिट्स, 75,064 कंट्रोल युनिट्स आणि VVPAT मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सुरळीत आणि सर्वसमावेशक मतदानासाठी 249 मॉडेल मतदान केंद्रे, 325 पूर्णपणे महिलांकडून चालवली जाणारी केंद्रे आणि 71 दिव्यांग व्यक्तींनी व्यवस्थापित केंद्रे तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.











