पालघर/नाशिक | प्रतिनिधी : महाराष्ट्रातील फार कमी ट्रेकर्सना माहिती असलेला उतवड ते भास्करगड, हरिहर गड, ब्रह्मगिरी पर्वत (त्र्यंबक गड), दुर्ग भंडार ते अंजनेरी गड असा सहा किल्ल्यांचा अवघड रेंज ट्रेक दुर्गेश विठ्ठल डांगळे (रा. चन्नाट,माणगाव सध्या मुंबई येथे वास्तव्यास) यांनी एकट्याने (सोलो) यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

दिनांक 18 ते 19 एप्रिल 2026 दरम्यान हा ट्रेक पार पडला. ट्रेकपूर्वी 17 एप्रिल रोजी त्यांनी पालघर जिल्ह्यातील सिर्सोनपाडा येथे मुक्काम केला. 18 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता उतवड गडाच्या पायथ्यापासून त्यांनी ट्रेकला सुरुवात केली. सुरुवातीला वाट न सापडल्याने स्थानिक आजींकडून माहिती घेत त्यांनी डोंगरधारेने चढाई करत अवघ्या दीड तासात उतवड गड गाठला.
यानंतर भास्करगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाण्याच्या टाक्याजवळून चढाई करत त्यांनी गडाचा मागील दरवाजातून प्रवेश केला. गडावरील गुंफा पाहत संपूर्ण परिसर फिरून ते निरगुडपाडा मार्गे पुढे निघाले. फणी डोंगराला वळसा घालत सायंकाळी हरिहर किल्ल्यावर पोहोचत त्यांनी तेथेच एकट्याने रात्री मुक्काम केला आणि सुंदर सूर्यास्ताचा अनुभव घेतला.
दुसऱ्या दिवशी (19 एप्रिल) पहाटे सूर्यउदयानंतर त्यांनी ब्रह्मगिरी पर्वताच्या दिशेने प्रस्थान केले. सुमारे तीन तासांच्या ट्रेकनंतर गंगाद्वार उगमस्थानी पोहोचून दर्शन घेतले. त्यानंतर 180 पायऱ्या उतरून पुन्हा थरारक चढाई करत त्यांनी ब्रह्मगिरी पर्वत माथा गाठला. पुढे जठा मंदिर मार्गे दुर्ग भंडारपर्यंत जाऊन परिसराचा नजारा अनुभवला.
त्यानंतर ब्रह्मगिरी उतरून त्यांनी अंजनेरी किल्ल्याची वाट धरली. अवघ्या एका तासात अंजनेरी गड गाठून श्री हनुमानाचे दर्शन घेत त्यांनी हा रेंज ट्रेक पूर्ण केला. विशेष म्हणजे, या दिवशी त्यांचा वाढदिवस असल्याने हा ट्रेक त्यांनी खास स्वतःसाठी आयोजित केला होता.
या मोहिमेद्वारे दुर्गेश डांगळे यांनी त्यांच्या आयुष्यातील 100वा सोलो गड पूर्ण केला असून किल्ल्यांवर 47 वेळा सोलो नाईट कॅम्पिंगचा अनुभवही त्यांनी घेतला आहे. ट्रेक पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्र्यंबक बसस्थानकावरून नाशिक रोडमार्गे मुंबईकडे प्रयाण केले.
दुर्गेश यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.













