कणकवली :
तालुक्यातील ओटव – ओटववाडी येथे वृद्ध महिलेला धमकावून त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनची जबरी चोरी करणाऱ्या नातवासह त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) मीरा-भाईंदर येथून ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने २८ एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी (२२ एप्रिल) सकाळी ११:३० च्या सुमारास सुवर्णा नारायण रावले (वय ६६) या घरात एकट्या असताना स्वयंपाक करत होत्या. यावेळी त्यांचा नातू साईल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (वय २३, रा. विरार पूर्व) हा आपल्या एका मित्रासह घरात घुसला. दोघांनी आजीच्या तोंडावर हात दाबून त्यांना बेडरूममध्ये नेले आणि त्यांच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोन्याची चेन व ४५ हजार रुपये किमतीची साडेनऊ ग्रॅमची सोन्याची चेन, असा एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला होता.
घरातून पळ काढताना साईल हा बेडरूमच्या खिडकीतून आजीला दिसला होता. आजीने तत्काळ दिलेल्या माहितीच्या आधारे कणकवली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तांत्रिक तपास करत आरोपींचा माग काढला आणि मीरा-भाईंदर येथून त्यांना अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई आणि श्री. डिसोजा यांच्या पथकाने केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर २८ एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.










