फोंडाघाट पंचक्रोशीत, अनंत चतुर्दशीला बहुसंख्य घरगुती बाप्पांचे भावपूर्ण विसर्जन !
मोरयाचा जयघोष, वाद्यांची साथ आणि फटाक्यांची आतषबाजी व युवाईचा जल्लोष !
फोंडाघाट: कुमार नाडकर्णी- गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत गेले ११ दिवस बाप्पांच्या सेवेत व्यस्त कुटुंबीय, आज बाप्पाच्या निरोपाच्या वेळी भाऊक झाले. “येईन पुढच्या वर्षी लवकर, भाव मनीचा खरा असू दे.” या बाप्पाच्या अपेक्षानंतर “आभाळागत माया तुझी, आम्हावर राहू दे.” अशी आर्त विनंती कुटुंबीयांनी आपल्या श्रद्धेय बापाकडे केली. “मोरयाss पुढच्या वर्षी लवकर. या हळूs हळूss चाला मुखाने गजानन बोला” च्या जयघोषात, युवाई मृदंग वाद्याच्या साथीने थिरकत होती. फटाक्यांची एकच आतजबाजीने परिसर दणाणत होता…

उगवाई नदीवर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, फोंडाघाट शाखेतर्फे नदी प्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षणासाठी, बांधलेल्या मंडपामध्ये विविध ड्रम्स मधून ओला- सुका फुलोरा- निर्माल्य संकलन करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाला भावीकानी – ग्रामस्थांनी सहकार्य केले. उपक्रमामध्ये सर्वश्री महेश साटम, दैविक हरियाण, दीपक शिंदे, प्रदीप हरियाण, मंदार लांबोरे, प्रकाश चिके या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला…

फोंडाघाट पोलीस हेड कॉन्स्टे.सुभाष शिवगण, पोलीस कॉन्स्टे.पाटील, आबिटकर (वाहतूक) आणि होमगार्ड यांनी विसर्जन मिरवणूक शांततेत, कुठलाही अनुचित प्रकार न घेता न होता शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडली. वाहतूक कोंडीवर पर्यायी व्यवस्था केल्याने, राज्यमार्ग सुरळीत ठेवण्यात यश मिळाले. या मिरवणुकीत फोंडाघाट बाजारपेठ, हवेलीनगर, विद्यानगर, मारुतीवाडी, आणि न्यू कुर्ली वसाहती मधली घरगुती गणपती मूर्त्या कित्येक वाहनांमधून सहभागी झाल्या. त्यामुळे एका बाजूने मिरवणुकीच्या वाहनांची लाईन भाविकांसह, तर दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरळीत ठेवण्यात यश मिळाले.

अखेर मिरवणूक उगवाई नदीच्या घाटावर आल्यावर, वाहनांमधून मुर्त्या खाली ओळीत ठेवण्यात आल्या. बाप्पाची आरती आणि सर्वांना सुखसमाधान, निरामय आयुष्य आणि भरभराटीसाठी सामूहिक साकडे घालण्यात आले .त्यानंतर एकामागून एक मुर्त्या उगवाई नदीच्या प्रवाहात विसर्जित करण्यात आल्या. भाविकांनी घरातून निघताना आणलेला लाह्या ,फळे ,मोदक, साखर फुटाणे यांचा प्रत्येकाचा प्रसाद एकत्र करून सर्वांना वाटण्यात आला. त्याची चव बाप्पाचा प्रसाद म्हणून पुढील वर्षभर ऊर्जा देणारी ठरते आणि जड अंतकरणाने रिता बाप्पाचा पाट डोक्यावर घेऊन प्रत्येक जण घराची वाट चालू लागला.आणि कधीच संपू नये असे वाटणाऱ्या या कोकणातील गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली. आता उद्यापासून सर्वांना वेध लागतील ते महालयाचे आणि जेवणकरी शोधण्याची ?












