चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण-गुहागर मार्गावर उक्ताड बायपास येथे पावसामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे रुग्णांना व पादचाऱ्यांना त्या रस्त्यावरून जात असताना कसरत करावी लागत असे. युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी याची तात्काळ दखल घेत आपल्या स्टाईलने राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत खडेबोल सुनावले होते. प्रसंगी युवक कॉंग्रेसच्या स्टाईलने आंदोलनाचा इशाराही दिला होता. श्री. सरगुरोह यांच्या या इशाऱ्याची तात्काळ दखल घेत अवघ्या दोन दिवसातच या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत.
चिपळूण-गुहागर मार्गावर वाहनांची तसेच नागरिकांची कायम वर्दळ असते. तसेच उक्ताड बायपास येथे लाईफकेअर हॉस्पिटल आहे. रुग्णांना व पादचाऱ्यांना त्या रस्त्यावरून जात असताना कसरत करावी लागत होती. उक्ताड बायपास या रस्त्यावर पावसाळ्यापूर्वी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती.
मात्र, गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पावसात या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले. राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी खड्डे बुजवू असे सांगत होते. मात्र, पंधरा दिवस उलटूनही दखल न घेतल्याने श्री. सरगुरोह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी श्याम खुनेकर यांना प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन रस्त्याची पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी श्याम खुनेकर यांनी दोन दिवसांपूर्वी उक्ताड बायपास येथे तातडीने येऊन रस्त्याची पाहणी केली व या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन श्री. सरगुरोह यांना दिले होते. श्री. सरगुरोह यांनी प्रसंगी युवक कॉंग्रेसच्या स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला होता. श्री. सरगुरोह यांच्या या इशाऱ्याची तात्काळ दखल घेत अवघ्या दोन दिवसातच या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत.












