पुणे रेड लाईट परिसरात पोलिसांची मोठी कारवाई; चार कुंटणखाने सील

 

अल्पवयीन मुलीच्या शोषणाचा धक्कादायक प्रकार उघड
बांगलादेशी महिलांची सुटका, पोलिस हवालदार निलंबित

पुण्यातील बुधवार पेठ रेड लाईट भागात पोलिसांनी मोठी कारवाई करत चार कुंटणखाने सील केले. एका बांगलादेशी अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने देहव्यवसायात ढकलल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात एजंट आणि मालकांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत ही कारवाई केली. तसेच, या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यालाही निलंबित करण्यात आले आहे.


पुणे : बुधवार पेठ येथील रेड लाईट परिसरात एका बांगलादेशी अल्पवयीन मुलीला बंदिस्त ठेवून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार कुंटणखान्यांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना सील केले. ही कारवाई फरासखाना पोलिसांनी केलेल्या तपासानंतर करण्यात आली असून पोलीस उपायुक्त क्रुषिकेश रावले यांनी आदेश दिले.

पीडित मुलीची जानेवारीमध्ये सुटका करण्यात आली होती. त्यानंतर तिने दिलेल्या तक्रारीत तिला बांगलादेशातून एजंटमार्फत भारतात आणून देहव्यवसायात ढकलल्याचे सांगितले. तिच्या जबाबावरून एजंट आणि कुंटणखाना चालकांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही मुलगी 2023 मध्ये केवळ 15 वर्षांची असताना तस्करी करून भारतात आणली गेली. तिला अनेक वर्षे बळजबरीने वेश्याव्यवसायात अडकवून ठेवले गेले. दरम्यान, तिने एकदा महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या मदतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संबंधित कॉन्स्टेबलनेच कुंटणखाना चालकाला माहिती दिल्याने ती पुन्हा तिथेच अडकली. या गंभीर प्रकारानंतर त्या महिला हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.

शनिवारी रात्री पोलिसांनी छापेमारी करताना आणखी तीन बांगलादेशी महिलांची सुटका केली. या महिला 33 ते 49 वयोगटातील असून त्या बेकायदेशीररीत्या भारतात राहत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.