लांजा शहरासह ग्रामीण भागात ऑनलाईन लॉटरी, क्लब, मटका, गावठी दारूधंदे जोमात

शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करावी

मनसेचे लांजा तालुका संपर्क अध्यक्ष अजित राऊत यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

लांजा( प्रतिनिधी) लांजा शहरासह ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन लॉटरी, क्लब, मटका, गावठी दारु असे अनधिकृत धंदे जोमाने सुरू आहेत. त्यामुळे तरुण पिढी त्याच्या आहारी जात असून अनेकांचे संसार देखील मोडून पडले आहेत. त्यामुळे अशा अवैध धंद्यावर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लांजा तालुका संपर्क अध्यक्ष अजित राऊत यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच लांजा पोलीस ठाणे यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात अजित राऊत यांनी म्हटले आहे की, यापूर्वी लांजा शहरात गांजासारख्या अमली पदार्थांच्या विक्री व सेवन यांचे प्रमाण वाढले होते. त्या पाठोपाठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा देखील यापूर्वी जप्त करण्याचा घटना घडलेल्या आहेत. मात्र पुन्हा एकदा अशा अवैध धंद्यानी लांजा शहरासह ग्रामीण भागात डोके वर काढले आहे. त्यामध्ये ऑनलाईन लॉटरी ,क्लब, मटका, गावठी दारू धंदे अशा प्रकारचे अनाधिकृत धंदे राजरोसपणे सुरू आहेत.
लांजा तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरात देखील जागोजागी अशा प्रकारे मटका, ऑनलाइन लॉटरी ,क्लब, असे धंदे जोमाने सुरू आहेत .अशा अवैध धंद्यानी तरुण पिढी देखील बरबाद होत असून अनेकांचे संसार देखील उध्वस्त झाले आहेत .त्यामुळे अशा अवैध धंद्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि लांजा शहर व ग्रामीण भाग अनधिकृत धंद्यापासून मुक्त करावा, अशी मागणी अजित राऊत यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.